एका वर्षात सहा जणांचे नेत्रदान
By Admin | Updated: June 10, 2016 01:33 IST2016-06-10T01:33:49+5:302016-06-10T01:33:49+5:30
दृष्टिदानाऐवढे मोठे दान नाही. दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश पोहोचवून जीवन उजळविण्याचे उदात्त कार्य मरणोत्तर पार पाडून सामाजिक ऋण फेडण्याची भूमिका

एका वर्षात सहा जणांचे नेत्रदान
जागतिक दृष्टिदान दिन : २०१५- १६ मध्ये १ हजार ३६४ मोतिबिंदू व १७ काचबिंदू शस्त्रक्रिया
गडचिरोली : दृष्टिदानाऐवढे मोठे दान नाही. दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश पोहोचवून जीवन उजळविण्याचे उदात्त कार्य मरणोत्तर पार पाडून सामाजिक ऋण फेडण्याची भूमिका प्रत्येकालाच बजावता येते. असेच उदात्त कार्य जिल्ह्यातील सहा व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदानाने केले आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात २०१५- १६ या वर्षात सहा व्यक्तींनी नेत्रदान करून सामाजिक ऋण फेडले. जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त घेतलेला हा आढावा...
जागतिक दृष्टिदान दिन १० जून रोजी दरवर्षी साजरा केला जातो. डॉ. भालचंद्र यांच्या स्मरणार्थ सदर दिवस साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. या दिवशी नेत्रदानाबाबतही नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
शरीर स्वास्थ्यासंबंधी सुदृढ आरोग्य असणे गरजेचे असते. जागतिक आरोग्य संघटना व जागतिक एजंसीच्या दृष्टीने व्हिजन २०२० अंतर्गत दृष्टीचा अधिकार कार्यक्रमांतर्गत दृष्टिहीनता निवारण (आयएबीपी) ची सुरूवात १९९९ पासून सुरू करण्यात आली. डब्ल्यूएचओ २०१४ च्या अनुमानानुसार जगात जवळपास २८५ कोटी लोक नेत्रहीन आहेत. यामध्ये ३९ लाख लोक अंध व २४६ कोटी लोक अल्पदृष्टीचे आहेत. दृष्टीदोषांच्या कारणामध्ये असंशोधित अपवर्तकहीनता (४३ टक्के), मोतिबिंदू (३३ टक्के) व अंधत्त्व जवळपास (८० टक्के) आदींचा समावेश आहे. राष्ट्रीय अंधत्त्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करून नेत्रदानाची जनजागृती केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात २०१५- १६ या वर्षात राष्ट्रीय अंधत्त्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सहा लोकांनी मरणोत्तर नेत्रदान केले. तसेच २०१५- १६ या वर्षात १ हजार ३६४ मोतिबिंदू तसेच १७ काचबिंदू रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनात नेत्रतज्ज्ञ डॉ. किरण मडावी व नेत्र चिकित्सा विभागाच्या चमूमार्फत सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. (शहर प्रतिनिधी)