शिपाईच सांभाळतो पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार
By Admin | Updated: October 13, 2014 23:21 IST2014-10-13T23:21:13+5:302014-10-13T23:21:13+5:30
परिसरातील पशुधनाची काळजी घेता यावी यासाठी रांगी येथे श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात आला. मात्र या दवाखान्यातील अनेक पदे रिक्त असल्याने शिपाईच कारभार सांभाळत असल्याचे दिसून येते.

शिपाईच सांभाळतो पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार
देवराव कुनघाडकर - रांगी
परिसरातील पशुधनाची काळजी घेता यावी यासाठी रांगी येथे श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात आला. मात्र या दवाखान्यातील अनेक पदे रिक्त असल्याने शिपाईच कारभार सांभाळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे.
निरंजनशहा महाराज काटेंगे हे जिल्हा परिषद सदस्य असतांना शासनाकडे पाठपुरावा करून पशुवैद्यकीय दवाखाना रांगी येथे मंजूर करून आणला. प्रथम हा दवाखाना हरिजी मडावी माध्यमिक विद्यालयाच्या बाजूला होता. त्यानंतर दवाखान्याकरिता स्वतंत्र्य इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीचे रितसर उद्घाटन होण्यापूर्वीच दवाखाना थाटण्यात आला. अगदी काही दिवसांतच इमारतीची दुर्दशा झाली आहे. दरवाजाचे प्लायवूड निघाले आहेत. काही ठिकाणी भिंतीला छिद्र पडले आहेत. तावदाने तुटली आहेत. स्लॅबचे बांधकाम योग्य नसल्याने पावसाळ्यात इमारत गळते. इमारतीची अवस्था अत्यंत वाईट असतांनाही अभियंत्याने कशी काय पास केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दवाखान्यात पशुधन अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व शिपाई अशी तीन पदे मंजूर आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात शिपाईच पूर्ण काम करतांना दिसून येतो. पशुधन अधिकाऱ्याचा प्रभार मागील तीन वर्षांपासून गोडलवाहीचे पशुधन अधिकारी गोस्वामी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र ते रांगीला कधी येतात व कधी जातात याचा पत्ताच लागत नाही. गोडलवाही ते रांगी यांच्यामध्ये १०० किलोमिटरचे अंतर आहे. एवढ्या दुरच्या अधिकाऱ्याकडे कसा काय प्रभार सोपविण्यात आला असाही प्रश्न उपस्थित होत आहे. रांगी परिसरातील पशुधनाची संख्या लक्षात घेता याठिकाणी स्वतंत्र पशुधन विकास अधिकारी नेमणे आवश्यक आहे. पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर भिकुंडी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र तेही रूजू न होता. एक महिन्याच्या वैद्यकीय रजेवर गेले होते. ते आता रूजू झाले आहेत. आतातरी त्यांनी चांगली सेवा द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.