सिम्युलेटर मशीन देणार डिझेल बचतीचे धडे
By Admin | Updated: December 6, 2014 01:32 IST2014-12-06T01:32:32+5:302014-12-06T01:32:32+5:30
बसचालकांमध्ये डिझेल बचतीविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने गडचिरोली आगाराला चंद्रपूर विभागीय कार्यालयाच्या मार्फतीने सिम्युलेटर मशीन प्राप्त झाली ...

सिम्युलेटर मशीन देणार डिझेल बचतीचे धडे
गडचिरोली : बसचालकांमध्ये डिझेल बचतीविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने गडचिरोली आगाराला चंद्रपूर विभागीय कार्यालयाच्या मार्फतीने सिम्युलेटर मशीन प्राप्त झाली असून सदर मशिनच्या साहाय्याने डिझेल बचतीचे धडे दिले जाणार आहेत.
एसटीच्या एकूण खर्चापैकी सर्वाधिक खर्च डिझेलवर होतो. त्यामुळे डिझेल बचतीसाठी एसटीकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. यामध्ये सर्वाधिक केपीटीएल (किलोमीटर पर टेन लिटर) देऊन डिझेल बचत करणाऱ्या चालकाचा सत्कार करण्यात येतो. तर कमी केपीटीएल देणाऱ्या चालकांना समजूत देण्यात येते. त्याचबरोबर डिझेल बचतीसाठी वाहन नेमके कसे चालवावे, याबाबतचेही विशेष प्रशिक्षण चालकांना देण्यात येते. मात्र एसटीला डिझेल बचत करण्यात पाहिजे त्या प्रमाणात यश प्राप्त झाले नाही. गडचिरोली आगारात दोन दिवसापूर्वीच चंद्रपूर विभागीय कार्यालयाने तयार केलेली सिम्युलेटर मशिन पाठविण्यात आली आहे. सदर मशिन एसटीच्या इंजिनप्रमाणे असून विशिष्ट प्रमाणात एक्सलेटर वाढविल्यानंतर इंजिनमधून किती डिझेल जाते. याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक चालकांना दाखविले जाणार आहे. मशीनचे एक्सलेटर वाढविल्यानंतर डिझेल एका भांड्यात जमा होते. अनावश्यक एक्सलेटर वाढविल्यामुळे किती डिझेल वाया जातो. या मशिनमुळे कळणार आहे. आजपर्यंत डिझेल बचतीविषयी अनेकवेळा चालकांचे समुपदेशन करण्यात येत होते. मात्र अनावश्यक डिझेल खर्च होण्याची प्रक्रिया मशीनच्या आतमध्येच घडत असल्याने त्याच्या मनपटलावार फारसा परिणाम होत नव्हता. या मशीनमुळे मात्र किती डिझेल अनावश्यक खर्च होतो, हे प्रत्यक्ष डोळ्याने बघता येणार आहे. त्यामुळे चालकांच्या डोळ्यासमोर अनावश्यक डिझेल खर्च होण्याची प्रत्यक्ष प्रतिमा निर्माण होण्यास मदत होणार आहे. ज्यावेळी चालक एक्सलेटर वाढविल त्यावेळी आपण किती अनावश्यक डिझेल खर्च करीत आहोत, याची कल्पना येण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)