सरलचे काम ६.७५%

By Admin | Updated: August 17, 2015 01:11 IST2015-08-17T01:11:58+5:302015-08-17T01:11:58+5:30

४ जुलैपासून तर १४ आॅगस्टपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सरल प्रणालीचे काम केवळ ६.७५ टक्के झाले आहे.

Simple work 6.75% | सरलचे काम ६.७५%

सरलचे काम ६.७५%

काम थांबले : १४ हजार ५२० विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण

लोकमत विशेष
दिलीप दहेलकर  गडचिरोली
सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या डेटाबेससाठी १५ आॅगस्ट ही डेडलाईन होती. ४ जुलैपासून तर १४ आॅगस्टपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सरल प्रणालीचे काम केवळ ६.७५ टक्के झाले आहे. आयुक्तस्तरावरून आता विभागीय वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे सरलचे काम सद्य:स्थितीत थांबले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांची महत्त्वाची माहिती संगणीकृत करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भाचे शिक्षण संचालकाचे पत्र झळकताच गडचिरोली जिल्ह्यात सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी डेटाबेसची माहिती अपलोड करण्यासाठी धावपळ सुरू केली. दुर्गम भागातील शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हीटी व सर्व्हरची समस्या उद्भवल्याने एटापल्ली, सिरोंचा तालुक्यातील अनेक शिक्षक गडचिरोली व आरमोरी या ठिकाणी येऊन डेटाबेसची माहिती भरू लागले. अनेक शिक्षक स्मार्टफोनच्या सहाय्याने डेटाबेसमध्ये माहिती अपलोड करण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र एकाचवेळी शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर ताण आल्याने सरलच्या वेबसाईटमध्ये समस्या निर्माण झाली.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या मिळून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण २ हजार ७९ शाळा आहेत. यापैकी ३५३ शाळांचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत १४ हजार ५२० विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून याची टक्केवारी ६.७५ आहे. विद्यार्थी नोंदणीच्या बाबतीत गडचिरोली जिल्ह्याचा राज्यात दहावा क्रमांक आहे. सर्व शाळांची माहिती अद्यावत झाल्यानंतर राज्यात लाखो बोगस विद्यार्थी आढळणार आहेत.
सायबर कॅफेतून माहिती भरण्यावर प्रतीबंध
सरल प्रणालीवर भरल्या जाणाऱ्या माहितीची गोपनियता पाळण्याच्या उद्देशाने सदर माहिती कोणत्याही परिस्थितीत खासगी सायबर कॅफेवरून भरू नये. असे करणे गुन्हा समजून संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश प्रधान सचिवांनी सर्व शिक्षकांना दिले आहेत. माहिती भरण्यासाठी शाळेच्या संगणकाचा, स्वत:च्या संगणकाचा किंवा आयसीटी लॅबचा वापर करावा. माहिती भरण्याचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम विद्यार्थ्यांची माहिती भरावी व सर्वात शेवटी शिक्षकांची माहिती भरण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत.
राज्यभरात केवळ ५.८२ टक्के काम
महाराष्ट्र राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत एकूण २ कोटी २५ लाख विद्यार्थी दाखल आहेत. यापैकी १४ आॅगस्टपर्यंत १ हजार ८४८ शाळांचे सरलचे काम प्रगतीपथावर असून एकूण ३० लाख ९ हजार ९७८ विद्यार्थ्यांची डेटाबेसमध्ये नोंदणी पूर्ण झाली आहे. या नोंदणीची टक्केवारी ५.८२ टक्के आहे.
४७२ शिक्षकांची माहिती अपलोड
गडचिरोली जिल्ह्यात सरल या डेटाबेसमध्ये १४० शाळांमधील केवळ ४७२ शिक्षकांची माहिती अपलोड झाली आहे. सरल प्रणालीत माहिती अपलोड करण्यासाठी शिक्षकांची प्रचंड धावपळ दिसून येत होती. दरम्यान सरलच्या सर्व्हरवर ताण येऊन समस्या निर्माण झाली. यावर उपाय म्हणून शिक्षण आयुक्तांनी नागपूर विभागासाठी ८ ते ११ सप्टेंबर या कालावधीत सरलचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सरलमध्ये अद्ययावत करावयाची माहिती
सरल प्रणालीच्या स्कूल डेटाबेसमध्ये शैक्षणिक साहित्य, संपूर्ण रेकॉर्ड, शाळा इमारती तसेच स्टॉफ डेटाबेसमध्ये शिक्षक, शिक्षकांची कौटुंबिक व शैक्षणिक माहिती, आवश्यक कागदपत्रे, नोकरीची नियुक्ती, बढती, बदली, सर्विस बूक व डिप्लोमा यांची स्कॅनिंग करणे आदी तसेच स्टुडंट डेटाबेसमध्ये चालू शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांची दाखल नोंद, प्रतिज्ञा लेखाप्रमाणे सविस्तर माहिती, विद्यार्थ्यांचे आई-वडील तसेच पालकांच्या नावासह वार्षिक उत्पन्न, बँक खाता क्रमांक, विद्यार्थ्यांची उंची, वजन, रक्त गट आदी माहिती अद्यावत करावयाची आहे.
८ ते ११ सप्टेंबर दरम्यान होणार सरलचे काम
सरल संगणक प्रणालीमध्ये एकाचवेळी सर्वच स्तरावरून मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक माहिती भरण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे स्टेट डाटा सेंटरवर ताण येत आहे. ही बाब ११ आॅगस्ट रोजी सर्व जिल्ह्यांच्या एनआयसी केंद्रावर शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांची घेण्यात आलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये लक्षात आली. त्यामुळे शिक्षण आयुक्त पुणे यांनी नवे वेळापत्रक जाहीर केले. नागपूर विभागातील शाळांनी ८ ते ११ सप्टेंबर २०१५ या कालावधीत सरलचे काम करावे असे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले आहे.

Web Title: Simple work 6.75%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.