शांतता रॅलीतून नक्षल्यांना प्रत्युत्तर

By Admin | Updated: July 30, 2016 01:59 IST2016-07-30T01:59:06+5:302016-07-30T01:59:06+5:30

२८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षली सप्ताह जिल्ह्यात पाळला जात आहे. या सप्ताहात जिल्ह्यात नक्षली कारवाया घडू नयेत,...

The silence rally responds to the naxals | शांतता रॅलीतून नक्षल्यांना प्रत्युत्तर

शांतता रॅलीतून नक्षल्यांना प्रत्युत्तर

पोलीस विभागाचा पुढाकार : कोरची, धानोरा, एटापल्ली, अहेरी येथे मेळावा
गडचिरोली : २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षली सप्ताह जिल्ह्यात पाळला जात आहे. या सप्ताहात जिल्ह्यात नक्षली कारवाया घडू नयेत, शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी याकरिता पोलीस विभागाच्या वतीने ठिकठिकाणी शांतता रॅली व मेळावे आयोजित करून नक्षली सप्ताहाला प्रत्युत्तर दिले जात आहे.
कोरची - नक्षली सप्ताहात कोरची पोलीस ठाण्याअंतर्गत शहरात शांतता रॅली काढण्यात आली. शुक्रवारी सकाळी ८ वाजता पोलीस ठाण्यातून काढलेल्या शांतता रॅलीला नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष कमलनारायण खंडेलवाल, नगरसेवक मनोज अग्रवाल, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अतुल तवाडे, नंदकिशोर वैरागडे, प्राचार्य मांडवे, प्रा. रूखमोडे उपस्थित होते. या रॅलीत वनश्री महाविद्यालय, आश्रमशाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
एटापल्ली - पोलीस ठाण्याच्या वतीने एटापल्ली येथे शांतता रॅली तसेच सांस्कृतिक पथकाद्वारे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कृषी विभागातर्फे धानाची लागवड, कीड नियंत्रण, आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तालुक्यातील निवडक प्रशिक्षणार्थ्यांसाठी २७ पासून चार दिवसीय शांतता मेळावा तसेच निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार यांच्या हस्ते झाले. यावेळी पं. स. उपसभापती संजय चरडुके, संवर्ग विकास अधिकारी लुटे, चांदेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव उपस्थित होते. चार दिवसीय मेळाव्यात शनिवारी योग प्रशिक्षण तसेच जनहितवादी युवा समितीचे सुरेश बारसागडे यांचा पेसाविषयक मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
अहेरी - येथील कन्यका परमेश्वरी मंदिरात गुरूवारी पोलीस विभाग, अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व पतंजली योग समितीच्या वतीने योग, प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अहेरी जिल्हा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ तलांडे, योग मार्गदर्शक श्रीनिवास भंडारी, पीएसआय रावराणे उपस्थित होते. शिबिरात भ्रस्त्रिका, कपालभाती, अनुलोमविलोम, अग्नीसार, उद्गीध यासह विविध आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
धानोरा - उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस ठाणे धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शांतता रॅली शहरात काढण्यात आली. या रॅलीत आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषा धारण करून वाद्यांसह सहभागी झाले होते. त्याबरोबरच शालेय विद्यार्थी व दुर्गम गावातील बहुसंख्य नागरिकही सहभागी झाले होते. रॅलीतून ‘हिंसा छोडो, देश जोडो’ अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान पथनाट्यही सादर करण्यात आले. रॅली उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत टिके यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली. (लोकमत वृत्तसेवा)

 

Web Title: The silence rally responds to the naxals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.