शिवसेनेचा विद्युत अभियंत्याला घेराव
By Admin | Updated: July 1, 2015 01:58 IST2015-07-01T01:58:00+5:302015-07-01T01:58:00+5:30
तालुक्यातील सोनेरांगी, वाशी व उराडी परिसरातील गांवाचा विद्यूत पुरवठा मागील १२ दिवसांपासून बंद असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी शिवसेनेचे

शिवसेनेचा विद्युत अभियंत्याला घेराव
नवीन रोहित्र बसविण्याचे आश्वासन : सोनेरांगी, वाशी व उराडी येथील वीज पुरवठा आहे बंद
कुरखेडा : तालुक्यातील सोनेरांगी, वाशी व उराडी परिसरातील गांवाचा विद्यूत पुरवठा मागील १२ दिवसांपासून बंद असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात विद्यूत उपअभियंता शेडमाके यांना सोमवारी घेराव घातला व वीज पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी केली.
यावेळी उपअभियंता शेडमाके यांनी आंदोलकांशी चर्चा करतांना सांगितले की, सोनेरांगी, वाशी व उराडी परिसरातील विद्यूत मधील बिघाड शोधून तो दुरूस्त केला जाईल असे आश्वासन दिले. खापरी येथील विद्यूज रोहित्र जळाला असून त्या ठिकाणी नवीन रोहित्र लावले जाणार आहे. कुरखेडा तालुक्यात यावर्षी नवीन १६ रोहित्र बसविले जाणार आहेत व ७५ नवीन रोहित्र बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो गडचिरोली येथील वीज कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रत्येक गावात स्वतंत्र सर्किट व रोहित्र बसविले जाणार आहे. अशी माहिती दिली. एक तास चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महेंद्र मोहबंसी, जिल्हा परिषद सदस्य अशोक इंदुरकर, शिवसेना उपतालुका प्रमुख लोमेश कोटांगले, नरेंद्र तिरणकर, सोनेरांगीच्या सरपंच निता घोडाम, दिगांबर मानकर, उपसरपंच बाबूराव कुमरे, तंटामुक्ती अध्यक्ष टिकाराम मांदाळे, गुरुदेव निकोडे, घनश्याम घोडाम, जगदीश कोहळे, नेताजी हजारे, सुरेश रणदिवे, विकास नारनवरे, रोषण निमजे, डॉ. अनिल उईके आदी मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)