झाडीपट्टीतील गावे नाटकांनी गजबजणार!
By Admin | Updated: November 15, 2015 01:00 IST2015-11-15T01:00:20+5:302015-11-15T01:00:20+5:30
विदर्भाची प्राचीनता थेट वैदिक काळापर्यंत दाखवता येते. आर्यांची दक्षिणेकडील सर्वात जुनी वसाहत म्हणून विदर्भाचा उल्लेख केला जातो.

झाडीपट्टीतील गावे नाटकांनी गजबजणार!
खेड्यापाड्यांत दिवाळीनंतर सजतो उत्सव : शंकरपट, मंडई, जत्रेच्या निमित्ताने होते आयोजन
अतुल बुराडे विसोरा
विदर्भाची प्राचीनता थेट वैदिक काळापर्यंत दाखवता येते. आर्यांची दक्षिणेकडील सर्वात जुनी वसाहत म्हणून विदर्भाचा उल्लेख केला जातो. पूर्वेकडील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांचा दाट वनाचा डोंगराळ प्रदेश म्हणजे झाडीपट्टी. झाडीपट्टीतील गावे आता नाटकांनी गजबजणार आहेत.
भरपूर पावसाचा पट्टा असलेल्या या भागात मुख्यत्वे करुन भातपीक घेतले जाते. खरीप हंगाम संपून धानरास घरी येणे आणि दिवाळी सण अशा दुहेरी आनंदात येथील नागरिक असतो. झाडीपट्टीत अनेक सण-उत्सव साजरे केले जात असले तरी दीपावली सणानंतरच गावोगावी बैलांचा शंकरपट व मंडई या लोकोत्सवांच्या निमित्ताने तमाशे, लीळा, दंडार, नाटक आदी कार्यक्रमांचे आयोजन गावोगावी होत असतात. पूर्वीपेक्षा आज वेळ, काळ, परिस्थिती व आवडीनिवडी बदलल्यामुळे झाडीच्या मूळ दंडारीला नाटकांनी पार झपाटून टाकल्याने वर्तमानस्थितीत दंडारनाट्य शेवटच्या घटका मोजत आहे. परिणामी नाटक हे झाडीपट्टी रंगभूमीची खास ओळख झाली आहे. नाटक झाडीपट्टीतील लोकांचे खास आकर्षण व आवड. आणि यातूनच मराठी रंगभूमीच्या धर्तीवर स्वतंत्र अशी ‘झाडीपट्टी रंगभूमी’ अस्तित्वात आली व आज ती सुवर्णावस्थेत आहे.
पाडव्यापासून झाडीपट्टीत खेडोपाडी शंकरपट व मंडईनिमित्य नाटक आयोजित केल्या जाणार आणि झाडीतील तमाम नाट्यरसिक नाटकांच्या वेडापायी, लालसेने खेड्यांकडे आपसुकच चुंबकासारखा ओढला जाणार व विरळ जनसंख्येचे गाव अफाट जनसागराने फुलून जाणार. घरोघर पाहुण्यांनी सजणार. एकविसाव्या शतकात मनोरंजनात्मक तांत्रिक साधनांच्या आगमनाने उत्सवाची परिभाषा जरी बदलत असली तरी झाडीपट्टीच्या नाटकांना होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे, हे मात्र नवलच! शंकरपट किंवा मंडई व नाटक हे येथील प्रत्येक गावचे समीकरण असून यामागे आणखी एक कारण असल्याचे जाणकार सांगतात ते म्हणजे लग्नसंबंध जुळवून आणण्यासाठीचे निमित्त.
मराठी रंगभूमी असतानाही स्वत:च्या अभिनय कौशल्याद्वारे झाडीतील लोकांनी एक स्वतंत्र झाडीपट्टी रंगभूमी निर्माण केली होती. आज मराठी रंगभूमीच्या पळत्या काळातही विसोरापासून हाकेच्या अंतरावरील देसाईगंज हे अर्धनागरी शहर झाडीपट्टी रंगभूमी नाटकांच्या आयोजनासाठी बहरलेले दिसून येते. आज झाडीपट्टी रंगभूमीला सुवर्णकाळच प्राप्त झाला आह,े असे म्हटल्यास निश्चितच वावगे ठरणार नाही.