माघ मासाच्या शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस म्हणजे, माघ शुद्ध चतुर्थी. महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीचे पुत्र गणपती हिंदू धर्मात प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते. सदर मंदिर हे जंगलात असल्यामुळे या ठिकाणी एकटे जायला कुणीही धजावत नाही. परंतु अनेक कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणी आता होत आहेत. मागील दहा वर्षांपासून मूळचे आलापल्ली येथील सेवानिवृत्त सहायक उपवनसंरक्षक एच. जी. मडावी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असून, येथे पाण्यासाठी एक हातपंप, किचन शेड आणि मंदिर दुरुस्ती असे अनेक विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच दरवर्षी गणेश जयंतीला मडावी परिवाराकडून येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
बाॅक्स .....
पातानिल गणेश मंदिराची अशी आहे कथा
आलापल्ली वन विभागातील आलापल्ली वन परिक्षेत्रअंतर्गत आलापल्ली सिरोंचा मुख्य मार्गावरील मलमपल्ली नर्सरीजवळ जंगलात पूर्वेकडे एक फाटा असून, तेथून अंदाजे ७ किलोमीटर अंतरावर पातानिल येथील कूप क्र. ५ कम्पार्टमेन्ट नंबर १८मध्ये सन १९८०मध्ये जंगलात कुपाचे कामे सुरू असताना त्या काळात आलापल्लीचे जंगल खूप घनदाट होते. त्यामुळे येथे जंगलातील जास्तीत जास्त लाकूड ओढणीची कामे ही हत्तीच्या साहाय्याने होत असत. कामे सुरु असताना एका हत्तींची संकल जमिनीत फसून असलेल्या एका दगडाला अडकली असता तो हत्ती त्या ठिकाणीच थांबला, नंतर त्या हत्तीची लोखंडी साखळी त्या दगडापासून मुक्त केली असता, तो हत्ती तिथून काही केल्या हालचाल करीत नव्हता. त्यामुळे जंगलात कामे करणाऱ्या मजूर आणि तत्कालीन वन कर्मचाऱ्यांनी त्या दगडाला जमिनीतून खोदून काढले असता जवळपास ४ फूट उंच गणेशाची मूर्ती निघाली. ती गणेश मूर्ती त्या हत्तीनेच आपल्या सोंडेद्वारे खोदलेल्या खड्ड्यातून बाहेर काढली. त्याच ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा उपस्थित नागरिकांनी केली. तेव्हापासून येथे स्वयंभू गणेश मंदिर तयार झाले. नवसाला पावणारा गणपती म्हणून सदर पातानिल गणेश मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.