भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेची काँग्रेसशी हातमिळवणी

By Admin | Updated: November 24, 2015 01:42 IST2015-11-24T01:42:49+5:302015-11-24T01:42:49+5:30

कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सात जागा मिळाल्या आहे. मात्र स्पष्ट बहुमत न मिळाल्याने

Shivsena's involvement with Congress to keep BJP out of power | भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेची काँग्रेसशी हातमिळवणी

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेची काँग्रेसशी हातमिळवणी

कुरखेडा : कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सात जागा मिळाल्या आहे. मात्र स्पष्ट बहुमत न मिळाल्याने येथे भाजपला सत्ता स्थापन करणे कठीण आहे. अशा स्थितीत राज्यात भाजप-सेनेचे सरकार असताना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेस-राकाँसोबत हातमिळवणी करून नगराध्यक्ष पद पक्षाकडे घेतले आहे.
सोमवारी कुरखेडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना, काँग्रेस, राकाँ व अपक्ष आघाडीतर्फे डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जि.प.चे उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेस नेते नवनाथ धाबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शाम धाईत, अयुब खान, जयंत हरडे, निकेश जांभुळे व अपक्ष गटाचे नेते शफीकुल्ला खान, नगरसेवक पुंडलिक देशमुख, संतोष भटड आदी उपस्थित होते. तर भाजपच्या वतीने मोहम्मद कलाम शेख यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. भाजप उमेदवार कलाम शेख यांचे नामांकन दाखल करताना आमदार क्रिष्णा गजबे, मोतीलाल कुकरेजा, विलास गावंडे, गणपत सोनकुसरे, राम लांजेवार, रविंद्र गोटेफोडे यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. कुरखेड्यात काँग्रेस, शिवसेना, राकाँ अशी आघाडी झाल्याने भाजप सत्तेबाहेर जाण्याची शक्यता आहे.
चामोर्शीत तीन उमेदवारांचे आठ नामांकन दाखल
चामोर्शी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलाकरिता राखीव आहे. सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी तीन नगरसेवकांनी एकूण आठ नामांकन अर्ज दाखल केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जयश्री पंकज वायलालवार यांनी चार नामांकन दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रज्ञा धिरज उराडे यांनी दोन तर भारतीय जनता पार्टीतर्फे कविता दिलीप किरमे यांनी दोन नामांकन अर्ज दाखल केले. तिन्ही उमेदवारांचे नामांकन अर्ज वैध ठरविण्यात आले असल्याची माहिती पिठासीन अधिकारी व्ही. एम. तळपादे यांनी दिली आहे. नामांकन अर्ज दाखल करताना सहायक पिठासीन अधिकारी यु. जी. वैद्य, नायब तहसीलदार (निवडणूक) एस. के. चडगुलवार आदी उपस्थित होते.
सिरोंचात तीन नामांकन दाखल
सिरोंचा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी तीन उमेदवारांनी तीन नामांकन अर्ज दाखल केले. भारतीय जनता पार्टीतर्फे राजू धर्मय्या पेदापल्ली यांनी एक तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सतिश सडवल्ली भोगे, रवीकुमार चंद्रय्या रालाबंडी या दोन उमेदवारांनी प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल केले आहे. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शालिकराम धनकर, तहसीलदार ए. सी. कुमरे, नायब तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार आदी उपस्थित होते.
भामरागडात तीन उमेदवारांचे चार अर्ज दाखल
भामरागड नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे राजू बंडू वड्डे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लक्ष्मी श्रीकांत मोडक व भाजपतर्फे कविता संतोष सिडाम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भामरागडचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असून कविता संतोष सिडाम यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. हे सर्व अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक विभागाने लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Shivsena's involvement with Congress to keep BJP out of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.