जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी तत्काळ जाहीर करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने इंदिरा गांधी चौकात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ढोल बजाओ आंदोलन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय श्रुंगारपवार, जिल्हा संघटिका छाया कुंभारे, उपजिल्हा प्रमुख निरांजनी चंदेल, गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव, जिल्हा वाहतूक सेना प्रमुख संतोष मारगोनवार, जिल्हा संघटिका सुनंदा आतला, तालुकाप्रमुख घनश्याम कोलते, उपजिल्हा प्रमुख नंदू कुमरे उपस्थित होते. इंदिरा गांधी चौकात ढोल वाजवून आंदोलन केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना प्रमुखांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन केले. त्याची दखल घेऊन शासनाने कर्जमुक्ती केली आहे. कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी तत्काळ जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 01:24 IST