महादेवगडात शिवभक्तांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:55 IST2018-02-14T00:55:11+5:302018-02-14T00:55:57+5:30

महादेवगडात शिवभक्तांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी/आष्टी : महाशिवरात्रीनिमित्त आरमोरीलगतच्या महादेवगड डोंगरी देवस्थानात जत्रा भरली. या जत्रेत शेकडो भाविकांनी हजेरी लावून महादेवाचे दर्शन घेतले. तसेच चपराळा येथील प्रशांतधाममध्ये जत्रेनिमित्त परिसरातील भाविकांनी मंगळवारी गर्दी केली. यावेळी भाविकांनी मनोभावे पूजाअर्चा करून महादेवाला सुख समृद्धीसाठी साकडे घातले.
महादेवगड डोंगरी देवस्थानावर सकाळी ९.३० वाजता देवस्थान समितीचे अध्यक्ष माजी आ. हरीराम वरखडे यांच्या हस्ते ब्रह्मपुरी येथील भैरव महाराज, रमेश घाटे यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर माजी आ. हरीराम वरखडे यांच्या हस्ते प्रथम शिवपूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला. दुपारी १ वाजता होमहवनाची पूजा करण्यात आली. याप्रसंगी गणपत वडपल्लीवार, रमेश घाटे, मोतीराम चापले, बापू पप्पुलवार, भूषण खंडाते यांच्यासह बहुसंख्य भाविक उपस्थित होते. इंदिरानगर डोंगर परिसराला आज सकाळपासूनच यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिर परिसरात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय गडचिरोली व आरमोरीच्या वतीने भाविकांना शिवशंकराबाबत माहिती देण्यात येत होती. १४ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता येथे गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रामुख्याने देवस्थान समितीचे अध्यक्ष माजी आ. वरखडे, आ. कृष्णा गजबे, माजी आ. आनंदराव गेडाम, माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार आदी उपस्थित राहणार आहेत.
जि.प. उपाध्यक्षांच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन
चपराळा येथील मंदीरामध्ये सोमवारी जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचे हस्ते यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी सकाळी ६ वाजता अभिषेक व समाधीचे बेलपूजन करण्यात आले. याप्रसंगी देवस्थान कमेटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर पंदिलवार, सचिव विठ्ठलराव गारसे, सर्व संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. भाविकांनी कार्तिकस्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शिवलिंगाची पूजा केली. सकाळी ७ वाजता खा. अशोक नेते यांनी पूजा करुन समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर आ.डॉ.देवराव होळी यांनी दर्शन घेतले . जि.प.च्या समाजकल्याण सभापती माधुरी उरेते यांनीही दर्शन घेतले. आष्टी पोलीस स्टेशन तर्फे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, पीएसआय नितेश गोहणे, विजय जगदाळे यांच्या नेतृत्वात १०० पोलीस जवान तैनात होते. विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या पाणपोईमुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली. समितीचे सुरेश कोकेरवार व तमुसचे अध्यक्ष साईनाथ गुरनुले हे व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.