जिल्ह्यात शिवसेना स्वबळावरच
By Admin | Updated: February 8, 2017 02:39 IST2017-02-08T02:39:53+5:302017-02-08T02:39:53+5:30
शिवसेना-भाजपचे राज्यात सरकार असले तरी अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहे.

जिल्ह्यात शिवसेना स्वबळावरच
जि. प. करिता २५ तर पं. स. करिता ५० जागी उमेदवार रिंगणात
गडचिरोली : शिवसेना-भाजपचे राज्यात सरकार असले तरी अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहे. गडचिरोली जिल्हाही याला अपवाद राहिलेला नाही. यावर्षीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावरच जि. प. करिता २५ जागांवर तर पंचायत समितीकरिता ५० जागांवर लढत असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी दिली आहे.
२०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना दोन जागांवर विजयी झाली होती. या दोन्ही जागा आरमोरी तालुक्यातील होत्या. मात्र त्यानंतर युवाशक्ती आघाडीचे बहुतांश जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेत दाखल झाले व शिवसेनेचे नेतृत्व पुन्हा सुरेंद्रसिंह चंदेल यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने संपूर्ण जिल्ह्यात २५ जागांवर उमेदवार उभे केले आहे. यामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रात १२, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ७ तर अहेरी विधानसभा क्षेत्रात ६ उमेदवार रिंगणात आहेत. कोरची येथे एका जागेवर कुरखेडा येथे ५, देसाईगंज येथे ३, आरमोरी येथे ३, गडचिरोली येथे २, चामोर्शी येथे ३, मुलचेरा येथे १, अहेरी येथे २, धानोरा २, सिरोंचा १, एटापल्ली तालुक्यात २ जागांवर शिवसेना जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहे. तर ५० जागांवर शिवसेनेने पंचायत समितीकरिता उमेदवार उभे केले आहे.
२०१२ च्या निवडणुकीत पळसगाव-अरसोडा व इंजेवारी-ठाणेगाव या आरमोरी तालुक्यातील दोन जिल्हा परिषद क्षेत्रातून शिवसेनेने विजय मिळविला होता. शिवसेनेत माजी जिल्हा प्रमुख हरीश मने यांच्या गटाला एक जागा या तिकीट वाटपात त्यांच्या पत्नीसाठी सोडण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेची ताकद आरमोरी विधानसभा क्षेत्रात असली तरी सेनेने यावेळी पहिल्यांदाच २५ उमेदवार मैदानात उतरविले आहे. शिवसेनेकडून विद्यमान जि. प. सदस्य लक्ष्मी मने, प्रा. अशोक इंदुरकर, निरांजनी चंदेल व पद्माकर मानकर या चौघांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मने आरमोरी, इंदुरकर कुरखेडा, चंदेल धानोरा तर मानकर कोरची तालुक्यातून मैदानात आहे.