झेंडेपार लोह प्रकल्पाची सुनावणी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:20 IST2017-08-04T00:19:48+5:302017-08-04T00:20:18+5:30
कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे लोहप्रकल्प उभारण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते.

झेंडेपार लोह प्रकल्पाची सुनावणी रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे लोहप्रकल्प उभारण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याबाबत विविध मतप्रवाह निघल्याने जनसुनावणी रद्द करण्यात आली. पुढील जनसुनावणीची तारीख अजूनपर्यंत निश्चित झाली नाही.
कोरची येथील झेंडेपार येथे मोठ्या प्रमाणात लोहखनिज आहे. या ठिकाणी लोहप्रकल्प निर्माण करण्यासाठी स्थानिक नागरिकांची परवानगी असणे आवश्यक आहे. यासाठी जनसुनावणीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र झेंडेपार परिसरातील नागरिकांना गडचिरोली येथे येणे शक्य नसल्याने कोरची या तालुकास्थळी जनसुनावणी घेण्याबाबतची मागणी सुरूवातीपासून केली जात होती. मात्र प्रशासनाने आपला हट्ट कायम ठेवत गडचिरोली येथेच ३ आॅगस्ट रोजी जनसुनावणी ठेवली. या जनसुनावणीला कोरची तालुक्यातील काही नागरिक उपस्थित झाले. मात्र कोरची येथे जनसुनावणी न ठेवल्याबाबतचा रोष नागरिकांमध्ये दिसून येत होता.
शासनाच्या नियमानुसार परिसरातील प्रत्येक नागरिकाचे मत जाणून घेणे आवश्यक असतानाही गडचिरोली येथे का जनसुनावणी ठेवली, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. काही नागरिक लोह खदाणीच्या बाजुने मत नोंदवित होते. तर काही नागरिक लोह खदाणीच्या विरोधात बोलत होते. त्यामुळे जनसुनावणीदरम्यान प्रचंड गदारोळ निर्माण झाला. परिणामी अधिकाºयांना जनसुनावणी रद्द करावी लागली. काही नागरिकांनी पुढील जनसुनावणी कोरची येथेच घेण्याबाबतचे लेखी आश्वासन अधिकाºयांना मागितले. मात्र अधिकाºयांनी लेखी आश्वासन दिले नाही. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे यांना विचारणा केली असता, जनसुनावणी रद्द झाली आहे. मात्र पुढील तारीख अजूनपर्यंत ठरली नाही, अशी माहिती दिली आहे.
चार सुनावण्यांना विरोध
जन सुनावणीसाठी झेंडेपार ग्रामसभेला प्रशासनाने पत्र दिले होते. त्यात अनूज माईन्स अॅन्ड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचाच उल्लेख होता. प्रत्यक्षात जनसुनावणी करताना चार कंपन्या होत्या. इतर कंपन्यांबाबत प्रशासनाने स्थानिक नागरिकांना अंधारात ठेवले. याबाबत काही जणांनी विरोध केला असता, त्यांना बाहेर काढले जात होते. बोलण्यासाठी जे तयार होते, त्यांना बोलू दिले जात नव्हते. कोरची येथे जनसुनावणी घेण्याबाबतची मागणी वेळोवेळी करूनही प्रशासनाने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. प्रशासनाने व कंपनीने स्थानिक नागरिकांची दिशाभूल केली आहे, असा आरोप लोह प्रकल्प विरोधी कृती समितीच्या पदाधिकाºयांनी केला आहे.