आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सेतू अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:36 IST2021-05-26T04:36:21+5:302021-05-26T04:36:21+5:30
गडचिराेली : काेराेना साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व पाेषणामध्ये खंड पडू नये, यासाठी पुढील शैक्षणिक ...

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सेतू अभियान
गडचिराेली : काेराेना साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व पाेषणामध्ये खंड पडू नये, यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षण सेतू अभियान राबविले जाणार आहे. आश्रमशाळा नियमित सुरू हाेईपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय २४ मे राेजी काढण्यात आला आहे.
काेराेनामुळे राज्यभरातील आश्रमशाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. तसेच पाेषण आहार मिळत नसल्याने त्यांचे कुपाेषणाचाही धाेका वाढला आहे. काेराेनाची साथ आणखी काही महिने राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लाॅकडाऊनमुळे आश्रमशाळा बंद राहून विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये, यासाठी शिक्षण सेतू अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जातील. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल. पूरक पाेषण आहारही दिला जाईल. शासकीय आश्रमशाळेतील व एकलव्य निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना डीबीटी दिली जाईल.
या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त प्रकल्प अधिकारी, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक यांच्यास्तरावर समिती स्थापन केली जाणार आहे. यामध्ये आश्रमशाळास्तरावरील समिती महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहे. या समितीमध्ये आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी, शाळेतील दाेन ज्येष्ठ शिक्षक, अधीक्षक व स्वयंपाकी यांचा समावेश राहणार आहे.
बाॅक्स....
गावात शिक्षक मित्रांची नेमणूक हाेणार
- प्रत्येक शिक्षकाला गाव नेमून दिले जाईल. त्या गावात जाऊन शिकविण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकाची असेल. बाहेरील व्यक्तींनी गावात प्रवेश करणे धाेकादायक असल्यास अशा परिस्थितीत गावातीलच एका शिक्षक मित्राची नेमणूक केली जाईल. ही नेमणूक केवळ तीन महिन्यांसाठी राहील.
- शिक्षण मित्र याेग्य पद्धतीने काम करीत आहे किंवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, आशा कर्मचारी, पालक, विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य आदी भेट देऊन नाेंद ठेवतील.
- पहिली ते चौथ्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेत दाखल केले जाणार आहे.
बाॅक्स...
पाेषण आहारामुळे लाभ
आश्रमशाळेतील विद्यार्थी निवासी स्वरूपात राहतात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबराेबरच पाेषणाचीही गरज आश्रमशाळा पूर्ण करते. मात्र काेराेनामुळे मागील वर्षभरापासून आश्रमशाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना पाेषण आहारही पुरविण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुपाेषणाचा धाेका निर्माण झाला हाेता. धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पालकांकडून सातत्याने हाेत हाेती. त्यानंतर उशिरा का हाेईना शासनाने पाेषण मूल्य उपलब्ध करून देण्याचा उल्लेख शिक्षण सेतू अभियानाच्या शासन निर्णयात केला आहे. आता हे पाेषण मूल्य कशा पद्धतीने उपलब्ध करून दिले जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.