खोटारड्या भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन तीव्र करा

By Admin | Updated: September 4, 2015 01:11 IST2015-09-04T01:11:54+5:302015-09-04T01:11:54+5:30

जनतेला खोटे आमिष दाखवून भाजप पक्षाने केंद्रात व राज्यात सत्ता हस्तगत केली. मात्र भाजपप्रणीत केंद्र व राज्य शासनाचे ध्येयधोरण शेतकरी, ...

Sharpen the agitation against the false government of the BJP | खोटारड्या भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन तीव्र करा

खोटारड्या भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन तीव्र करा

युवक काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा : हिम्मतसिंह यांचे युवकासह नेत्यांना आवाहन
गडचिरोली : जनतेला खोटे आमिष दाखवून भाजप पक्षाने केंद्रात व राज्यात सत्ता हस्तगत केली. मात्र भाजपप्रणीत केंद्र व राज्य शासनाचे ध्येयधोरण शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधी आहे. सर्वच पातळीवर सरकार अपयशी ठरले आहे. आगामी काळात भाजप नेत्यांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत तीव्र आंदोलन करावे, असे आवाहन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव हिम्मतसिंह यांनी केले.
लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने गुरूवारी येथील पटेल मंगल कार्यालयात आयोजित युवक काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत ते होते. या मेळाव्याचे उद्घाटन काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी हरिक्रिष्ण पुजाला उपस्थित होते. यावेळी मंचावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हसनअली गिलानी, जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प. सदस्य केसरी उसेंडी, मनोहर पोरेटी, पी. आर. आकरे, पंकज गुड्डेवार, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, सगुणा तलांडी, लता पेदापल्ली, चंदू वडपल्लीवार, महेंद्र ब्राह्मणवाडे, संतोष आत्राम, समशेरखॉ पठाण, परसराम टिकले, पांडुरंग घोटेकर, शंकर सालोटकर आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना हरिक्रिष्ण पुजाला म्हणाले, देशात व राज्यात भाजपचे नेते विचित्र प्रकारचे राजकारण करीत आहे. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात नोकर भरतीची अधिसूचना लागू करून गैरआदिवासींवर अन्याय केला आहे. यामुळे जिल्ह्यात आदिवासी व गैरआदिवासी बांधवांमध्ये भांडण सुरू झाले आहे. राज्यपालांच्या ९ जून २०१४ रोजीच्या अधिसूचनेमुळे गैरआदिवासी बेरोजगारांची नोकरी व रोजगार मिळण्याची दारे बंद झाली आहेत. नागरिकांचे संविधानिक अधिकार हिरावण्याचा कोणालाही अधिकार नाही. मात्र भाजप सरकारने अधिसूचना लागू करून पाप केले आहे. या मुद्यावर काँग्रेस व युवक काँग्रेस मोठा संघर्ष करणार , असेही पुजाला यावेळी म्हणाले.
हरिश पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ पोकळ घोषणा करीत आहे. भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने आतापर्यंत सर्वसामान्य हिताचा एकही निर्णय घेतला नाही. काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचे हित जोपासते, असेही ते यावेळी म्हणाले. रवींद्र दरेकर यांनी आपल्या भाषणातून भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. खोट्या व लबाड आश्वासनावर सत्ता हस्तगत केलेल्या भाजप नेत्यांना आगामी काळात घरचा रस्ता दाखविण्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करू, असे दरेकर यावेळी म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी व हसनअली गिलानी यांनी भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले.
कार्यक्रमाचे संचालन युवक काँग्रेसचे महासचिव सतिश विधाते यांनी केले. याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मेळाव्याला जिल्हाभरातून काँग्रेस व युवक काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
पेसा अधिसूचनेत बदल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-विजय वडेट्टीवार
युवक काँग्रेसचे आंदोलन आदिवासी नागरिकांच्या हक्काच्या विरोधात नाही. काँग्रेस पक्षाने सदैव सर्वधर्म समभाव जोपासून तळागाळातील नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे. पेसा कायदा व राज्यपालांच्या नोकरभरती संदर्भातील अधिसूचनेवरून गडचिरोली जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या काळात रान पेटविले होते. मात्र आता भाजपचे खासदार , आमदार व इतर नेते गप्प बसले आहेत. गैरआदिवासींवरील अन्याय आपण खपवून घेणार नाही. काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने जिल्ह्याच्या गावागावात जनजागृती करून भाजपच नेत्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा भवन व मुख्यमंत्र्याला घेराव आंदोलन करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, राज्यपालांच्या नोकरभरती अधिसूचनेत सुधारणा करण्यासाठी सरकारला भाग पाडू, असे आश्वासनही वडेट्टीवार यांनी दिले.

Web Title: Sharpen the agitation against the false government of the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.