शापोआ कर्मचाऱ्यांची धानोरात निदर्शने
By Admin | Updated: June 27, 2017 00:55 IST2017-06-27T00:55:15+5:302017-06-27T00:55:15+5:30
राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत माध्यान्ह भोजन बनविणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते.

शापोआ कर्मचाऱ्यांची धानोरात निदर्शने
मानधनात वाढ करण्याची मागणी : १५ वर्षांपासून सुरू आहे अन्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत माध्यान्ह भोजन बनविणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते. गेल्या १५ वर्षांपासून हे कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या प्रमुख मागणीला घेऊन आयटकचे राज्य महासचिव विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात धानोरा पंचायत समितीसमोर कर्मचाऱ्यांनी रविवारी निदर्शने केली.
यावेळी संघटनेच्या तालुकाध्यक्ष कल्पना जंबेवार, तालुका संघटक कामेश काटेंगे, कार्याध्यक्ष सुधाकर नरचुलवार, उपाध्यक्ष गीता बोमनवार यांच्यासह धानोरा तालुक्यातील शेकडो शापोआ कर्मचारी उपस्थित होते.
मागील हिवाळी अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शापोआ कर्मचाऱ्यांना ७ हजार ५०० रूपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शापोआ कर्मचाऱ्यांच्या मानधनात शासनाने वाढ केली नाही. गेल्या १५ वर्षांपासून शापोआ कर्मचाऱ्यांना एक हजार रूपये एवढ्या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. संघटनेच्या वतीने वारंवार शासनस्तरावर मानधन वाढीची मागणी करूनही शासनाने मानधनात वाढ केली नाही. त्यामुळे शापोआ कर्मचाऱ्यांनी पं. स. समोर शासनाच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी महीला उपस्थित होत्या.