विहीर बांधकामात शंकरनगर अव्वल
By Admin | Updated: March 17, 2016 01:49 IST2016-03-17T01:48:01+5:302016-03-17T01:49:32+5:30
गडचिरोली जिल्ह्यासह आरमोरी तालुक्यात वन कायद्याच्या कचाट्यामुळे सिंचन प्रकल्प रखडले असले तरी आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा ....

विहीर बांधकामात शंकरनगर अव्वल
भाजीपाला उत्पादनावर भर : पाच वर्षात उभारल्या दीडशे सिंचन विहिरी
जोगीसाखरा : गडचिरोली जिल्ह्यासह आरमोरी तालुक्यात वन कायद्याच्या कचाट्यामुळे सिंचन प्रकल्प रखडले असले तरी आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षात दीडशे सिंचन विहिरी उभारल्या आहेत. विशेष म्हणजे, शंकरनगर गावात रोहयोतून सन २०१५-१६ या चालू वर्षात ३० विहिरींचे काम हाती घेण्यात आले आहे. शंकरनगर ग्रामपंचायत सिंचन विहीर बांधकामात अव्वल ठरली आहे.
शंकरनगर या गावात जवळपास २०० कुटुंब आहेत. या गावात मंजूर ३० सिंचन विहिरींपैकी १३ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. विहीर बांधकामासाठी या गावात एकूण ११ गट आहेत. एका गटात सात मजूर याप्रमाणे ७७ मजूर सिंचन विहिरीच्या बांधकामावर कार्यरत आहेत. विहिरीच्या माध्यमातून येथील शेतकरी कारली, चवळी व भाजीपाला पिकाचे उत्पादन घेत आहेत. (वार्ताहर)