गडचिरोलीत आढळला शेकरू
By Admin | Updated: June 18, 2016 00:55 IST2016-06-18T00:55:41+5:302016-06-18T00:55:41+5:30
शहरातील लांझेडा वॉर्डातील हनुमान मंदिराच्या परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास राज्य प्राणी

गडचिरोलीत आढळला शेकरू
राज्यप्राणी : कोनसरी येथील संगोपन केंद्रात सोडले
गडचिरोली : शहरातील लांझेडा वॉर्डातील हनुमान मंदिराच्या परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास राज्य प्राणी म्हणून ओळखल्या जाणारा व अत्यंत दुर्मीळ समजला जाणारा शेकरू प्राणी आढळून आला.
लांझेडा वॉर्डातील काही मुलांना तो दिसून आल्यानंतर त्यांनी ही माहिती नागरिकांना दिली. याच वॉर्डातील शार्दुल जुवारे या विद्यार्थ्याने शेकरूला पकडले. त्यानंतर सदर प्राणी पोटेगाव मार्गावरील विभागीय कार्यालयात नेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच मुख्य वन संरक्षक कल्याणकुमार, सहायक उपवनसंरक्षक नायकवाडे यांनी भेट देऊन शेकरूची पाहणी केली. त्यानंतर सदर शेकरू चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील शेकरू संगोपन केंद्रात सोडण्यात आला.
शेकरू हा अत्यंत दुर्मीळ प्राणी असल्याने याचे संगोपन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी समयसूचकता दाखवीत त्याला पकडले व वन विभागाकडे स्वाधीन केले. याबाबत वन विभागातील अधिकाऱ्यांनी शार्दुलसह इतर नागरिकांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)