शहीद अमृतकर यांचा मरणोत्तर गौरव
By Admin | Updated: February 11, 2017 02:00 IST2017-02-11T02:00:36+5:302017-02-11T02:00:36+5:30
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस शिपाई स्वरूप अमृतकर शहीद झाले होते.

शहीद अमृतकर यांचा मरणोत्तर गौरव
मुलुंड येथे कार्यक्रम : प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात सन्मान
गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस शिपाई स्वरूप अमृतकर शहीद झाले होते. शहीद स्वरूप अमृतकर यांना महाराष्ट्र सेवा संघ मुंबई या संस्थेमार्फत मरणोत्तर पुरस्काराने नुकतेच मुलुंड (पश्चिम) येथे गौरविण्यात आले.
या सोहळ्यात १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धात जबर जखमी झालेल्या व सेवानिवृत्तीनंतर पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणारे लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील, नवदलात उल्लेखनीय सेवा देणारे तसेच गतिमंदांसाठी काम करणारे निवृत्ती कमांडर श्रीरंग बिजूर, गुप्त वार्ता विभागात सेवा बजावणारे निवृत्त पोलीस उपायुक्त शिरीष इनामदार यांना यंदाचा महाराष्ट्र सेवा संघ मुंबई पुरस्कृत ‘प्रेरणा पुरस्कार’ लार्सन अँड टुब्रोचे ज्येष्ठ संचालक वाय. एम. देवस्थळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शहीद स्वरूप अमृतकर यांच्या मातोश्री कल्पना अमृतकर, भाऊ त्रिवेदी अमृतकर यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. रोख रक्कम व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून वांद्रे येथे मोटारसायकलस्वारांच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या विलास शिंदे यांनाही मरणोत्तर पुरस्कार कुटुंबीयांना सुपूर्द करून गौरविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)