सात तालुका क्रीडा संकुल थंडबस्त्यात
By Admin | Updated: December 7, 2014 22:49 IST2014-12-07T22:49:48+5:302014-12-07T22:49:48+5:30
उद्योन्मुख व प्रतिभावान खेळाडू घडविणे, बालवयात खेळाची आवड निर्माण करणे, राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे हे राज्याच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे धोरण आहे.

सात तालुका क्रीडा संकुल थंडबस्त्यात
जागेअभावी : वन विभागाकडे प्रस्ताव प्रलंबित
दिलीप दहेलकर - गडचिरोली
उद्योन्मुख व प्रतिभावान खेळाडू घडविणे, बालवयात खेळाची आवड निर्माण करणे, राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे हे राज्याच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे धोरण आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याचा क्रीडा विकास अद्यापही कोसोदूर असल्याचे दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे, क्रिडांगणाचा अभाव. प्रत्येक तालुका ठिकाणी तालुका क्रीडा संकूल उभारणे हे राज्याचे क्रीडा धोरण आहे. मात्र जागेअभावी जिल्ह्यातील ७ तालुका क्रीडा संकूल थंडबस्त्यात असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
क्रीडा विकासाकरीता तालुका हा घटक महत्त्वाचा असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विविध खेळाच्या किमान सुविधा निर्माण करण्यासाठी तालुका क्रीडा संकूल उभारण्याची योजना राज्याच्या क्रीडा विभागाच्यावतीने राबविण्यात येते. क्रीडा धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकूल प्रस्तावित आहे. बारापैकी आरमोरी, देसाईगंज, सिरोंचा, आलापल्ली या चार ठिकाणी तालुका क्रीडा संकुलांचे काम अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहेत. मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने चामोर्शी, धानोरा, कुरखेडा, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, कोरची आदी सात तालुकास्तरावर अद्यापही तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आले नाही.
पूर्वी तालुका क्रीडा संकुलांची योजना २५ लाख रूपयाची होती. मात्र खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासनाने २००९ पासून सदर योजना १ कोटीची केली आहे. तालुका क्रीडा संकुलाच्या १ कोटी अनुदानातून १० टक्के रक्कम संकुलाची जागा खरेदी करण्याचे प्रयोजन आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने उर्वरित ७ तालुका क्रीडा संकूलासाठी जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तालुका क्रीडा संकुलासाठी कमीतकमी २ हेक्टर आर जागा आवश्यक आहे. जिल्ह्यातील ७ तालुका क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, भामरागड, एटापल्ली, कोरची या ठिकाणी तालुका क्रीडा संकूल उभारण्यासाठी सामूहिक वनहक्कांतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी व वनविभागाकडे सादर करण्यात आला आहे. यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. धानोरा येथे तालुका क्रीडा संकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध असून ती क्रीडा विभागाला हस्तांतरित होणार असल्याची माहिती आहे.
तालुका क्रीडा संकुलामध्ये ४० मिटर धावनपथ, इनडोअर गेम हॉल, खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी आदी खेळांची दोन मैदाने, बॉस्केटबॉल, टेनिस, शूटिंग रेंज पाणी पुरवठा, ड्रेनेज, विद्युतीकरण व संरक्षण भिंत आदींचा समावेश असून क्रीडा साहित्य असणे आवश्यक आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली येथे जिल्हा स्टेडीअम, जिल्हा क्रीडा प्रबोधनी आहे. आलापल्ली येथे तालुका क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. आरमोरी येथील तालुका क्रीडा संकुलांचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून देसाईगंज, सिरोंचा या ठिकाणी तालुका क्रीडा संकुलाचे ५० टक्के काम झाले आहे. सदर तालुका क्रीडा संकूल पूर्णत्वास आल्यानंतर साहित्य उपलब्ध होऊन त्या भागातील खेळाडूंना खेळांचा सराव करता येणार आहे. मात्र अन्य सात तालुक्यात अद्यापही तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे या तालुक्यातील खेळाडूंपुढे सरावासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. याचा परिणाम क्रीडा विकासावर होत आहे.