कारसह सात लाखांचा दारूसाठा जप्त
By Admin | Updated: November 26, 2015 01:23 IST2015-11-26T01:23:57+5:302015-11-26T01:23:57+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या जिल्हा दारुबंदी पथकाच्या पोलिसांनी बुधवारी पहाटे ...

कारसह सात लाखांचा दारूसाठा जप्त
दोघांना अटक : चामोर्शी तालुक्यात चित्तरंजनपुरात ८५ हजारांची दारू सापडली
गडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या जिल्हा दारुबंदी पथकाच्या पोलिसांनी बुधवारी पहाटे गडचिरोलीच्या बाजार चौकातून कार व मोटारसायकलसह ६ लाख ३१ हजार रुपये किमतीची देशी दारु जप्त केली. तर चामोर्शी तालुक्याच्या चित्तरंजनपूर येथून ८५ हजार ४५० रूपयांची अशी एकूण ७ लाख ६ हजार रूपयांची दारू जप्त केली आहे.
गडचिरोलीच्या अवैध प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हे दाखल केले असून, दोघांना अटक केली आहे. विनोद गोविंदा शेंडे व गुरुदेव प्रभाकर गेडाम अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे काही इसम मारुती कार व मोटारसायकलने गडचिरोलीत दारु आणून विकत असल्याची माहिती दारुबंदी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बाजार चौकात पाळत ठेवून ७६ हजार ८०० रुपयांच्या देशी दारुच्या १६ पेट्या (७६८ निपा), ५५ हजार रुपयांची टीव्हीएस मोटारसायकल व ५ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कार असा एकूण ६ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
याप्रकरणी पोलिसांनी विनोद शेंडे, गुरुदेव गेडाम, रमेश गणवेणवार, विनय चकूरवार, किरण ताटपल्लीवार व अरुण ताटपल्लीवार यांच्यावर मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. यातील विनोद शेंडे व गुरुदेव गेडाम यांना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा दारुबंदी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विजय महल्ले यांच्या नेतृत्वात हवालदार कांबळे, परिमल बाला, बांबोळे, ढवळे, चवारे, राठोड, साखरे, तायडे आदींनी ही कारवाई केली.
दुसऱ्या एका धाडीत चामोर्शी तालुक्यातील चित्तरंजनपूर येथे पोलिसांनी ८५ हजार ४५० रूपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला. विष्णू परमानंद सरकार, सपना विष्णू सरकार या दोघांकडून हा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. विदेश्ी कंपनीच्या ८८ निपा तर विस्कीच्या २२३ निपा जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी पती-पत्नी आरोपी फरार आहेत. संबंधित आरोपींविरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पथकाच्या वतीने देण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)