देवलमरीत सिमेंट प्रकल्प उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:23+5:302021-02-05T08:51:23+5:30
अहेरी : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या देवलमरी, कारेपल्लीत सिमेंट निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला दगड आहे. त्यामुळे देवलमरी ...

देवलमरीत सिमेंट प्रकल्प उभारा
अहेरी : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या देवलमरी, कारेपल्लीत सिमेंट निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला दगड आहे. त्यामुळे देवलमरी परिसरात सिमेंट उद्योग उभारण्याची मागणी होत आहे. हा सिमेंट प्रकल्प उभारल्यास रोजगाराची समस्या सुटण्यास फार मोठी मदत होणार आहे.
दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस
अहेरी : तालुक्यातील आलापल्लीनजीक असलेल्या नागेपल्ली येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस स्थितीत आहे. लाखो रुपये खर्चून सदर इमारत बांधण्यात आली. मात्र, या ठिकाणी यंत्र सामग्री आणलेली नाही.
शहरातील वॉल्व दुरूस्त करण्याची मागणी
गडचिरोली : मुख्य पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या पाईपलाईनवर अनेक ठिकाणी वॉल्व बसविण्यात आले आहेत. मात्र, यातील अनेक वॉल्व लिकेज असल्याने पाण्याची गळती होत राहाते. परिणामी संबंधित टाकीमध्ये कमी पाणी जमा होते. सदर वॉल्व दुरूस्तीची मागणी होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.
रामपूरचे दत्त मंदिर दुर्लक्षित
आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे दत्ताचे आहे. भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मंदिराचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
पर्जन्यमापक वास्तूची दुरूस्ती करा
सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.
मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष
धानाेरा : तालुक्यातील अनेक दुर्गम व अतिदुर्गम गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात अद्याप अनेक समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे नागरिकांना विकासासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे.
कॅम्प एरियात डासांचा प्रादुर्भाव वाढला
गडचिरोली : शहरातील कॅम्प एरियातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कॅम्प एरियात नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी.
पोटेगाव रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : शहरातील पोटेगाव मार्ग निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. या मार्गाने अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी पहाटे व सायंकाळी जात असतात. परंतु पोटेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजुुला घाणीचे साम्राज्य आहे. अनेकदा मागणी करूनही स्थानिक प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.
फुले वॉर्डातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था
गडचिरोली : शहरातील फुले वार्डात सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे. मात्र, या शौचालयाची देखभाल व दुरूस्ती केली जात नाही. परिणामी सदर शौचालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यावर खर्च केलेले हजारो रुपये पाण्यात गेले आहेत. नगर परिषदेने सदर शौचालय पुन्हा सुरू करावे, अशी मागणी होत आहे. मात्र, याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.
मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी
धानोरा : जिल्ह्यात मधसंकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मधसंकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे.
गंजलेल्या विद्युत खांबांमुळे अपघाताचा धोका
आलापल्ली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युतखांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत.
प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कागदोपत्रीच
गडचिरोली : शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचे आदेश जारी केले आहेत. परंतु ही बंदी केवळ कागदावरच दिसून येत आहे. ५० मायक्रॉन जाडीपेक्षा कमी व ८ ते १२ इंच उंचीपेक्षा लहान आकाराची प्लास्टिक पिशवी वापरणे व उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई करावी.
चामोर्शी तालुक्यातही गावांना रस्त्याची प्रतीक्षा
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील वेंगनूर येथे अद्याप शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
शहरातील पार्किंगच्या जागा खुल्या करा
गडचिरोली : शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे पार्किंगच्या जागाही हॉयजॅक झाल्या आहेत. अनेक रस्त्यांवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमाणामुळे वाहतुकीची काेंडी हाेण्याचे प्रमाण वाढले आहे.