जिल्ह्यात ४०० संयुक्त देयता गट स्थापन करणार
By Admin | Updated: August 29, 2015 00:14 IST2015-08-29T00:14:09+5:302015-08-29T00:14:09+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५४ शाखांमधून ३ लाख ९० हजार ग्राहकांना बँकिंग सेवा पुरविली जात आहे.

जिल्ह्यात ४०० संयुक्त देयता गट स्थापन करणार
जिल्हा बँकेचा संकल्प : शेतकऱ्यांना मिळणार सुलभ कर्ज
गडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५४ शाखांमधून ३ लाख ९० हजार ग्राहकांना बँकिंग सेवा पुरविली जात आहे. जिल्ह्यातील लघु व्यावसायिक व सर्वसामान्यांच्या मागणीनुसार नाबार्डच्या साहाय्याने जिल्ह्यात संयुक्त देयता गट स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला असून बँकेंमार्फत जिल्ह्यात ४०० संयुक्त देयता गट स्थापन करण्याचा संकल्प बँक प्रशासनाने केला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हावासीयांकरिता नवीन दोन योजनांचा शुभारंभ केला आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या हस्ते दैनिक बचत ठेव संकलन व कर्ज योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक क्रिष्णा कोल्हे, बँक आॅफ इंडियाचे जिल्हा अग्रणी प्रबंधक एस. एम. पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आईलवार आदी उपस्थित होते.
यावेळी उद्घाटनीय भाषणात मार्गदर्शन करताना बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, गडचिरोली जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या फार वेगळा असून उद्योगधंदेविरहीत जिल्हा आहे. येथील शेती व्यवसाय पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील लघु व्यावसायिक, बेरोजगार व युवकांनी जिल्हा बँकेच्या संयुक्त देयता गटाच्या माध्यमातून स्वत:चा व जिल्ह्याचा विकास साधावा, असे सांगितले. जिल्हा बँकेमार्फत संयुक्त देयता गटाचे नेटवर्क तयार करावयाचे असून किमान कौशल्यावर आधारित लघु व्यावसायिकांनी जिल्ह्यातील लहान-मोठ्या व्यावसायिकांना सूक्ष्म पथपुरवठा होण्याकरिता ५ ते १० व्यक्तीचा समुह तयार करून संयुक्त देयता गट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.
यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक क्रिष्णा कोल्हे यांनी जिल्हा बँकेचे कार्य उत्तमरित्या सुरू असून यात बँकेने संयुक्त देयता गटाची योजना सुरू करून जिल्हावासीयांना स्वयंपूर्ण होण्याची दालने खुली केली आहेत, असे त्यांनी सांगितले. जिल्हा अग्रणी प्रबंधक एस. एम. पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला बँकेचे उपव्यवस्थापक टी. डब्ल्यू. भुरसे, डी. जे. वालदे, एम. बी. निखाडे, सहाय्यक व्यवस्थापक जी. के. नरड, आर. वाय. सोरते, ए. के. पत्रे आदींसह महिला व व्यावसायिक उपस्थित होते. प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार, संचालन किरण साबरे यांनी केले तर आभार सहाय्यक व्यवस्थापक आर. वाय. सोरते यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)