१०० टक्के उपस्थितीच्या सक्तीने आश्रमशाळांमध्ये खळबळ
By Admin | Updated: August 22, 2015 01:54 IST2015-08-22T01:54:27+5:302015-08-22T01:54:27+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे १७ आॅगस्ट रोजी काढण्यात आलेल्या पत्राच्या अन्वये प्रत्येक आश्रमशाळेला

१०० टक्के उपस्थितीच्या सक्तीने आश्रमशाळांमध्ये खळबळ
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे १७ आॅगस्ट रोजी काढण्यात आलेल्या पत्राच्या अन्वये प्रत्येक आश्रमशाळेला विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आश्रमशाळांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
दिवसेंदिवस आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची घटत चाललेली उपस्थिती हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. यावर प्रतिबंध घालून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांनी १७ आॅगस्ट २०१५ रोजी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीबाबतचा आढावा घ्यावा, त्याचबरोबर ज्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्केपेक्षा कमी आहे, अशा आश्रमशाळेतील शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सदर अहवाल तीन दिवसांच्या आत सादर करण्याचेही बंधन घालण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने राबविलेला हा उपक्रम अतिशय चांगला असला तरी विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती कधीच राहणे शक्य नाही. १०० टक्के उपस्थिती नसल्यास वेतन रोखण्याचा इशारा पत्रातून देण्यात आला असल्याने शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत प्रकल्प अधिकारी विकास राचर्लावार यांना विचारणा केली असता, विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली नसून ९० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. पत्रामध्ये चुकीने १०० टक्के असा उल्लेख झाला असावा, याबद्दलचे शुद्धीपत्रक काढले जाईल, अशी माहिती लोकमतशी बोलताना दिली. (नगर प्रतिनिधी)