ज्येष्ठ नागरिकांनी सन्मानासाठी झटावे

By Admin | Updated: February 2, 2017 01:18 IST2017-02-02T01:18:47+5:302017-02-02T01:18:47+5:30

ज्येष्ठ नागरिकांना समाजात सन्मानाने जगता यावे, त्यांचे वृद्धापकाळातील जीवन सुखकर व्हावे,

Senior citizens have to fight for honor | ज्येष्ठ नागरिकांनी सन्मानासाठी झटावे

ज्येष्ठ नागरिकांनी सन्मानासाठी झटावे

 द. तु. चौधरी यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा
गडचिरोली : ज्येष्ठ नागरिकांना समाजात सन्मानाने जगता यावे, त्यांचे वृद्धापकाळातील जीवन सुखकर व्हावे, या हेतूने शासनाच्या वतीने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा. समाजात सन्मान मिळण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून नेहमी झटावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबईचे अध्यक्ष द. तु. चौधरी यांनी केले.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मुंबई व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्येष्ठ नागरिकांच्या-चरितार्थ व कल्याणासाठी, अधिनियम २००७ व नियम २०१० अन्वये ज्येष्ठ नागरिकांकरिता एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा बुधवारी आयोजित करण्यात आली. पोटेगाव मार्गावरील गोंडवन कलाकेंद्रात आयोजित कार्यशाळेत द. तु. चौधरी बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, फेस्कॉमचे उपाध्यक्ष ना. ना. इंगळे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशदा पुणेचे सहयोगी प्रा. डी. डी. देशमुख, प्रा. अंबादास मोहिते, डॉ. अर्चना ठोंबरे, अ‍ॅड. बी. टी. निसळ, वनवैभव प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष पा. ये. भांडेकर, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष डी. एन. बर्लावार, उपाध्यक्ष पी. एस. घोटेकर, सचिव डी. डी. सोनटक्के, कोषाध्यक्ष डी. एच. गेडाम, सहसचिव बी. बी. होकम तसेच कार्यकारिणीतील सदस्य व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविकेतून डी. एन. बर्लावार म्हणाले, ज्येष्ठ नागरिक संस्थेसाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु शासनाच्या नवीन जीआरनुसार जागा उपलब्ध होऊ शकत नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या हेतूने हक्काची जागा प्रशासनाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याकरिता यापुढेही संघर्ष केला जाईल. ज्येष्ठांच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन डी. एन. बर्लावार यांनी केले.
कार्यशाळेतील सत्राला सुरुवात झाल्यानंतर प्रा. अंबादास मोहिते यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ व नियम २०१० कायदा संमत करण्यात आला. केंद्र शासनाच्या या कायद्यानुसार ज्येष्ठांना आत्मसन्मान जगता यावे, याकरिता विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सर्व सोयीसवलती या कायद्यानुसार उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन मोहिते यांनी केले. तत्पूर्वी उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजना व कायद्यांविषयी अ‍ॅड. निसळ, ना. ना. इंगळे, प्रा. देशमुख, डॉ. अर्चना ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Senior citizens have to fight for honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.