बियाण्यांची खरेदी निम्म्याने घटली
By Admin | Updated: July 31, 2015 01:39 IST2015-07-31T01:39:06+5:302015-07-31T01:39:06+5:30
मागील वर्षीच्या खरीप हंगामात सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली होती.

बियाण्यांची खरेदी निम्म्याने घटली
घरच्या बियाण्यांचा वापर वाढला : धानाला कमी भाव असल्याचा परिणाम
दिगांबर जवादे गडचिरोली
मागील वर्षीच्या खरीप हंगामात सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली होती. यावर्षीच्या हंगामात मात्र ही खरेदी निम्म्यावर आली असून ३० जुलैपर्यंत केवळ १२ हजार ५८६ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे.
चांगल्या दर्जाच्या बियाण्यांची उगवण क्षमता अधिक राहते. त्याचबरोबर सदर बियाण्यांचा वापर केल्याने उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरी वर्ग कंपन्यांच्या मार्फतीने तयार केलेले बियाणे शेतात वापरण्यावर अधिक भर देत होते. त्यामुळे मागील काही वर्षात खासगी कंपन्यांच्या मार्फतीने तयार करण्यात आलेल्या बियाण्यांचा वापर वाढला होता. याचा फायदा बियाणे कंपन्यांनी उचलण्यास सुरूवात केली होती. शेतकऱ्यांकडचे बियाणे खरेदी केल्यानंतर सदर बियाणे पॅकींग करून तीन पट किमतीने विकले जात होते. परिणामी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना फार मोठी किमत मोजावी लागत होती.
मागील वर्षी जिल्हा भरातील शेतकऱ्यांनी सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी केली होती. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असल्याने धानाच्या बियाण्यांची सर्वाधिक विक्री झाली. मागील वर्षीच्या हंगामात सुमारे २३ हजार ३४८ क्विंटल धानाच्या बियाण्यांची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी मात्र ही मागणी निम्म्याने घटली आहे. ३० जुलैपर्यंत केवळ १२ हजार ५८६ क्विंटल बियाणे खरेदी करण्यात आले आहे. त्यामध्ये धानाचे बियाणे ११ हजार ८०० क्विंटल एवढे आहे. पेरणीचा हंगाम पूर्णपणे संपला असून यानंतर बियाण्यांची मागणी होणे शक्य नाही.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अत्यंत कमी भाव मिळाला. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली नाही. जवळ असलेले धान्य बियाणे म्हणून वापरले. धानाला कमी भाव मिळाल्याने महागडे बियाणे खरेदी करणेही शक्य नव्हते. यावर्षी अगदी सुरूवातीपासूनच पाऊस हुलकावणी देत आहे. महागडे बियाणे पेरूनही करपण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे महागडे बियाणे खरेदीकडे बहुतांश शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांनी स्वत:च शोधला पर्याय
बियाणे कंपन्या शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करतात. त्यातील खराब बियाणे काढून घेतात. उर्वरित बियाण्यांना किडनाशक पदार्थ लावून ते चांगल्या पध्दतीने पॅकींग केले जाते. एवढी प्रक्रिया करण्यासाठी बियाणे कंपन्या तीन ते चार पट किमत वसूल करून अफाट नफा कमवित आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरचेच बियाणे कसे किडनाशक बनवावे, याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना किडनाशक बियाणे कसे करावे हे माहीत झाले. परिणामी शेतकऱ्यांनी स्वत:च चांगले बियाणे करण्यास सुरूवात केली. त्यामुळे बाजारातील बियाण्यांची मागणी प्रथमच यावर्षी निम्म्याने घटली आहे.