एटीएममध्ये सुरक्षारक्षक नियुक्त करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:08 IST2021-02-18T05:08:25+5:302021-02-18T05:08:25+5:30
मामा तलावातील जलसाठ्यात घट देसाईगंज : तालुक्यात माजी मालगुजारी (मामा) तलाव बरेच आहेत; परंतु मायनरवरील आऊटलेट (मोरी बांधकाम)ची कामे ...

एटीएममध्ये सुरक्षारक्षक नियुक्त करावे
मामा तलावातील जलसाठ्यात घट
देसाईगंज : तालुक्यात माजी मालगुजारी (मामा) तलाव बरेच आहेत; परंतु मायनरवरील आऊटलेट (मोरी बांधकाम)ची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसातील पाणी अडू शकले नाही. या तलावाची दुरुस्ती केल्यास हे तलाव शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरू शकतात. याकडे लक्ष देऊन मामा तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
बेरोजगारांना मुद्रा कर्ज योजनेचा लाभ द्या
कुरखेडा : केंद्र सरकारने बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रावर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र, या योजनेंतर्गत कर्ज देण्यास जिल्ह्यातील अनेक बँका चालढकल करीत आहेत. त्यामुळे बेरोजगार त्रस्त झाले आहेत.
सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षितच
गडचिरोली : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. या भागात वीज, पाणी, आरोग्य यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.
झिंगानूर परिसरात सिंचन सुविधा तोकड्याच
सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर हे आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या भागात रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीवरच उपजीविका करावी लागते. मात्र, सिंचनाअभावी शेतीसुद्धा साथ देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दारिद्र्यात जीवन जगावे लागते. सिरोंचा तालुक्यात पाणी पातळी अधिक आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बोअरवेल किंवा विहीर देण्याची मागणी आहे. तालुक्यात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही.
गडचिराेली शहरात माकडांचा धुमाकूळ
गडचिराेली : शहरात सकाळपासून दिवसभर माकडांचा धुमाकूळ सुरू असतो. त्यामुळे घरांच्या छतांचे, झाडांचे फळे-फुले, घरावरील गरिबांचे कवेलू व टिनांचे घरांचे नुकसान होत आहे. शहरात माकडांनी जंगलाची वाट सोडून शहराकडे धाव घेतली आहे. शहरातील प्रत्येक नगरातील नागरिकांना ते त्रासदायक ठरत आहे. परसबागेतील फळझाडे, पेरू, सीताफळ, पपईच्या झाडांचे नुकसान सुरू केले आहे. माकडांची टोळी एकापाठोपाठ एक घरांच्या छपरांवर रांगेत उच्छाद मांडतात.
रिक्त पदांमुळे विविध योजना कागदावरच
सिंदेवाही : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, तालुक्यात पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने विकासाच्या योजना पशुपालक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. पंचायत समितीने सुधारित आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी मिळाली आहे; पण पदे भरली नाहीत. त्यामुळे योजना कागदावरच राहिल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
तालुक्यात स्वच्छता मोहिमेचा बोजवारा
चामाेर्शी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. देशात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, काही उपद्रवी नागरिकांमुळे अभियानाचा बोजवारा उडत आहे.
बँकेसाठी दोन किमीची पायपीट
कोरची : कोरची येथील बँक ऑफ इंडिया शाखेची इमारत लहान आहे. अपुऱ्या जागेमुळे येथे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच गावापासून दोन किमी अंतरावर ही बँक आहे. त्यामुळे पायपीट करत नागरिकांना बँक गाठावे लागते. त्यामुळे गावातच भाड्याने इमारत घेऊन बँकेची व्यवस्था करावी. कोरचीमध्ये रिक्षा, आटो, आदी प्रवासी वाहनांची सुविधा नाही. त्यामुळे कोरची शहरातील वयोवृद्ध ग्राहक, ज्येष्ठ नागरिक व शाळकरी मुलांना बँकेत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.
जिल्ह्यातील सौर दिवे दुरुस्त करावेत
आष्टी : शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्ह्यातील विविध गावांत सौर पथदिवे सुरू केले; मात्र यातील अर्धेअधिक सौरदिवे बंद अवस्थेत आहेत. काही सौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
वाढीव वस्त्यांमध्ये नाली व रस्त्यांचा अभाव
गडचिरोली : गडचिरोली शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, वस्त्यांमध्ये वाढ होत आहे. येथील कारमेल शाळेच्या मागील परिसरात शेकडो घरांची वस्ती आहे. आरमोरी मार्गावरील मंगल कार्यालयाच्या तसेच वनविभागाच्या नाक्याच्या मागील परिसरात अनेक घरे बांधण्यात आली आहेत. मात्र, या वस्त्यांमध्ये नाली व रस्त्यांचा अभाव आहे. नगर पालिका प्रशासनाने या भागात विकासकामे मंजूर करून मूलभूत सोयी-सुविधा कराव्यात, अशी मागणी वाढीव वस्तीतील नागरिकांनी केली आहे. मात्र, नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष आहे.
पुरुष नसबंदीबाबत अनेक ठिकाणी गैरसमज
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. पुरुषांमध्ये या कुटुंब नियोजनाच्या नसबंदीबाबत गैरसमज असल्याने ते पुढे येत नाहीत.
चारचाकींमुळे बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी
गडचिरोली : शहरातील पटेल सायकल स्टोअर्स ते आठवडी बाजार या मार्गावर चारचाकी वाहनांना तसेच जड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे. नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी कठडे लावून बंदी घातली होती.
अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करा
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडले असून, भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिराेली : थुंकीतून कोरोनाचा प्रसार होतो. खर्रा, तंबाखू, पान खाणाऱ्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नका व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे वेळोवेळी केले जात आहे. तरीसुद्धा नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
प्रखर दिव्यांमुळे अपघाताचा धोका
चामाेर्शी : दुचाकी वा चारचाकी वाहनांच्या पुढे दिवे (हेड लाईट) लावले जातात; मात्र काही तरुण साधे दिवे न लावता निळ्या रंगाचे तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या तरुणांवर कारवाई करून अपघाताला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.