सत्वशिलातार्इंच्या भेटीने दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते ‘चार्ज’
By Admin | Updated: July 10, 2014 23:34 IST2014-07-10T23:34:26+5:302014-07-10T23:34:26+5:30
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह विदर्भातही काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. विदर्भात पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे पक्षाचे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते निराश झाले होते.

सत्वशिलातार्इंच्या भेटीने दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते ‘चार्ज’
पराभवानंतर चैतन्य : विदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाला संजीवनी मंत्र
अभिनय खोपडे -गडचिरोली
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह विदर्भातही काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. विदर्भात पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे पक्षाचे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते निराश झाले होते. या कार्यकर्त्यांना हिंमत देण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्वशिला चव्हाण यांनी नुकतेच केले.
पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्याचा त्यांनी दौरा करून तरूण कार्यकर्ते, पक्ष संघटनेतील पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेसाठी पूर्व विदर्भात चार ठिकाणी कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते. या माध्यमातून कार्यकर्त्यांना सोशल मीडियावरून पक्षावर होणाऱ्या टीकेला उत्तर कसे द्यायचे आदी बाबीचे धडे पुणे व मुंबई येथील तज्ज्ञांनी कार्यकर्त्यांना दिले. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्याच्या पत्नीसोबत संवाद साधण्याची संधी या निमित्ताने कार्यकर्त्यांना मिळाली. भंडारा, गोंदिया जिल्ह्याची कार्यशाळा तुमसर तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याची कार्यशाळा चामोर्शी येथे वर्धा जिल्ह्याची कार्यशाळा जाम येथे तर नागपूर शहरातही एक कार्यशाळा घेण्यात आली. अत्यंत गोपनिय पध्दतीने प्रसार माध्यमांनाही दूर ठेवत या कार्यशाळांचे आयोजन करण्याची जबाबदारी काँग्रेसचे आरमोरी येथील ज्येष्ठ नेते रविंद्र दरेकर, चामोर्शीचे विनोद खोबे, भंडारा, गोंदियाचे राजू बालपांडे, अमर वऱ्हाडे, हिंगणघाटचे माधव घुसे, नागपूरचे प्रफुल गुडधे यांच्याकडे देण्यात आली होती. संपूर्ण दिवसभराच्या कार्यशाळेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पक्षाच्या आमदार, खासदारांनाही दूर ठेवण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे कार्यशाळेच्या निमित्ताने आलेल्या सत्वशिला चव्हाण यांनी चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच चामोर्शी येथील वनविभागाच्या अगरबत्ती उद्योगाला भेट देऊन येथे काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला.
त्यामुळे या भागातील प्रश्नांचीही माहिती त्यांनी घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. याचा किती सकारात्मक परिणाम आगामी काळात होतो हे दिसून येईल.