अहेरी तालुक्यात दुसऱ्यांदा कापूस बियाण्यांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 05:00 IST2021-06-11T05:00:00+5:302021-06-11T05:00:07+5:30
गेर्रा येथील राकेश सडमेक यांच्या घरी हे प्रतिबंधित बियाणे ठेवले असल्याची गाेपनीय माहिती पोलीस विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी राकेश सडमेकच्या घरी धाड टाकली. त्याच्या घरी दहा पोत्यांमध्ये भरून ठेवलेले कुठलेही वेष्टण /पॅकिंग नसलेले अवैध ४३० कि.ग्रॅ. खुले बियाणे आढळून आले. शासकीय दराने त्याची किंमत ७ लाख ४१ हजार ५११ रुपये हाेते.

अहेरी तालुक्यात दुसऱ्यांदा कापूस बियाण्यांवर धाड
लाेकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील गेर्रा येथील एका घरी छापा टाकून पोलीस व कृषी विभागाच्या भरारी पथकाने ७ लाख ४१ हजार ५११ रुपये किमतीचे अनधिकृत बीटी कापूस बियाणे जप्त केले. आठवडाभराआधी तालुक्यातील आपापल्ली येथून २३ लाख ६४ हजार ४७२ रुपयांचा बीटी बियाणे जप्त केले होते. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर बीटी बियाणांचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
गेर्रा येथील राकेश सडमेक यांच्या घरी हे प्रतिबंधित बियाणे ठेवले असल्याची गाेपनीय माहिती पोलीस विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी राकेश सडमेकच्या घरी धाड टाकली. त्याच्या घरी दहा पोत्यांमध्ये भरून ठेवलेले कुठलेही वेष्टण /पॅकिंग नसलेले अवैध ४३० कि.ग्रॅ. खुले बियाणे आढळून आले. शासकीय दराने त्याची किंमत ७ लाख ४१ हजार ५११ रुपये हाेते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बियाणांचे निरीक्षण केले असता, सदर साठा पूर्णपणे अवैध व विनापरवाना शासन मान्यता नसलेला आढळला. हे बियाणे प्रतिबंधित एचटीबीटी असण्याची शक्यता आहे. सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन अहेरी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला.
या प्रकरणातील मुख्य आराेपी राकेश सडमेक हा फरार आहे. त्याच्या विराेधात भादंवि कलम ४२०, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदींनुसार तक्रार दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई कृषी विभागाच्या तालुका भरारी पथकाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी संदेश खरात, कृषी अधिकारी प्रदीप राऊत तसेच पोलीस विभागातील बिट अंमलदार देवीदास मानकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक आरती नरोटे करीत आहेत.