आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू
By Admin | Updated: April 9, 2017 01:23 IST2017-04-09T01:23:53+5:302017-04-09T01:23:53+5:30
‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची गडचिरोली शहरात नगर पालिकेतर्फे

आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू
डीपीआर तयार होणार : मुख्याधिकाऱ्यांनी दिले आदेश
गडचिरोली : ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची गडचिरोली शहरात नगर पालिकेतर्फे अंमलबजावणी सुरू झाली आहे. या संदर्भातचे आदेश मुख्याधिकारी निपाने यांनी रामदेवबाबा चॅरिटेबल सोसायटी नागपूरला दिले आहे. दुसऱ्या टप्प्यातील घरकूल बांधकामाचा डीपीआर तयार करून कृती आराखडा तयार होणार आहे.
गडचिरोली शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना या योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वकांक्षी योजना कार्यान्वित केली आहे. गडचिरोली पालिकेतर्फे पहिल्या टप्प्यांतर्गत १ हजार ८ घरकुलांचा अंतिम प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यापूर्वी रामदेवबाबा चॅरिटेबल सोसायटीतर्फे शहरातील सर्व वार्डात सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये किती कुटुंबांकडे हक्काचे घर नाही, कोणत्या कुटुंबाला घरकुलाची आवश्यकता आहे. याबाबतचा संपूर्ण तपशील तयार करण्यात आला. त्यानंतर चॅरिटेबल सोसायटीने डीपीआर तयार करून तो नगर पालिका प्रशासनाकडे सादर केला. नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घरकुलाच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यानंतर १ हजार ८ घरकुलांचा अंतिम मंजुरीसाठी कृती आराखड्यासह म्हाडाकडे सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात पहिल्या टप्प्यातील प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता पालिका प्रशासनाने वर्तविली आहे. पहिल्या टप्प्यात गोकुलनगर व विवेकानंद नगर भागातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात घरकुलाचा लाभ कुटुंबांना देण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न चालविले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी दुसऱ्या टप्प्याचा कार्यारंभ आदेश रामदेवबाबा चॅरिटेबल सोसायटीला २ एप्रिल २०१७ रोजी दिला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली शहराचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करावा तसेच त्यानंतर शासनाची मंजुरी मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पार पाडावी, असे संस्थेला दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेने ३१ फेब्रुवारी रोजी ठराव पारित करण्यात आला आहे. (नगर प्रतिनिधी)