दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव
By Admin | Updated: July 6, 2017 01:47 IST2017-07-06T01:47:08+5:302017-07-06T01:47:08+5:30
शहरात रस्त्याच्या दुतर्फा अवैध अतिक्रमणधारकांनी बस्तान मांडले होते. या अतिक्रमणधारकांविरोधात ४ जुलैपासून मोहीम राबविण्यात आली.

दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव
व्यावसायिक प्रतिष्ठाने पाडली : चामोर्शीत नगर पंचायतची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अवैध अतिक्रमणधारकांनी बस्तान मांडले होते. या अतिक्रमणधारकांविरोधात ४ जुलैपासून मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीम दुसऱ्याही दिवशी सुरूच होती. येथील अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली.
बुधवारी लक्ष्मीगेटपासून मुख्य बाजारपेठ असलेल्या दुकान व्यावसायिकांनी लावलेल्या लोखंडी टिनाचे शेड काढण्यात आले. अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील टिनाचे शेड स्वत: काढले तर बांधकाम करण्यासाठी रस्त्यावर ठेवलेले बांधकाम साहित्य उचलण्यात न आल्याने प्रशासनाकडून जेसीबी मशीनद्वारे सदर साहित्य जमा करून ट्रॅक्टरद्वारे ताब्यात घेण्यात आले. चामोर्शी शहरातील संपूर्ण पानटपऱ्या, चहाटपरी, चायनीज, हॉटेल, फळांचे दुकान तसेच मुख्य रस्त्यावर असलेले सिमेंट काँक्रिटचे उंचवटे काढण्यात आले. सदर उंचवटे जेसीबी मशीनच्या सहाय्याने काढण्यात आले. बसस्थानक परिसरात असलेल्या किरकोळ व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोरील अतिक्रमण स्वत:च काढले. बुधवारी सकाळपासून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात आली. मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील अतिक्रमण सायंकाळपर्यंत काढण्यात आले. याकरिता नगर पंचायत प्रशासनाकडून जेसीबी व ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी अर्शिया जुही, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात उपस्थित होते.
शहरातील रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे नालीतील गाळ उपसा करण्यास व आठवडी बाजाराच्या दिवशी रहदारीसाठी अडचण निर्माण व्हायची. त्यामुळे मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी दुकानदारांना सूचना केल्या होत्या. सदर दुकानदारांनी स्वत: अतिक्रमण काढून न. पं. ला सहकार्य केले आहे, असे मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी सांगितले.