काेराेना रुग्णांवर उपचार करणाऱ्या दाेन रुग्णालयांना ठाेकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 05:00 IST2021-05-03T05:00:00+5:302021-05-03T05:00:33+5:30
दाेन्ही रुग्णालयांच्या संचालकांनी प्रशासनाची काेणतीही परवानगी घेतली नव्हती. शासकीय रुग्णालयांमध्ये हाेणाऱ्या काेराेना रुग्णांच्या गर्दीचा गैरफायदा या खासगी दवाखान्याच्या संचालकांनी उचलण्यास सुरुवात केली. रुग्णांकडून लाखाे रुपये वसूल केले जात हाेते. ही बाब प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहीत झाली. २ मे राेजी या दवाखान्यांची तपासणी केली असता दाेन्ही दवाखान्यात प्रत्येकी ५ रुग्ण आढळून आले.

काेराेना रुग्णांवर उपचार करणाऱ्या दाेन रुग्णालयांना ठाेकले सील
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : प्रशासनाची काेणतीही परवानगी न घेता काेराेना रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या देसाईगंज येथील दाेन रुग्णालयांना प्रशासनाने कारवाई करून सील ठाेकले आहे. नगरपरिषदेच्या हद्दीत कब्रस्तान मार्गावर डाॅ. मनाेज बुद्धे यांचे बुद्धे हाॅस्पिटल आहे, तर गांधी वाॅर्डात श्रीकांत बन्साेड यांच्या मालकीचे बन्साेड हाॅस्पिटल आहे. या दाेन्ही रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार केले जात हाेते.
विशेष म्हणजे, या दाेन्ही रुग्णालयांच्या संचालकांनी प्रशासनाची काेणतीही परवानगी घेतली नव्हती. शासकीय रुग्णालयांमध्ये हाेणाऱ्या काेराेना रुग्णांच्या गर्दीचा गैरफायदा या खासगी दवाखान्याच्या संचालकांनी उचलण्यास सुरुवात केली. रुग्णांकडून लाखाे रुपये वसूल केले जात हाेते. ही बाब प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहीत झाली. २ मे राेजी या दवाखान्यांची तपासणी केली असता दाेन्ही दवाखान्यात प्रत्येकी ५ रुग्ण आढळून आले. या रुग्णांना काेविड केअर सेंटरमध्ये पाठवून दाेन्ही रुग्णालयांना सील ठाेकले आहे. विशेष म्हणजे, डाॅ. बुद्धे हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. मनाेज बुद्धे व डाॅ. बन्साेड हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. श्रीकांत बन्साेडे हे दाेघेही नातेवाईक आहेत. या दाेन्ही हाॅस्पिटलला सील ठाेकले असले तरी त्यांच्या विराेधात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
ही कारवाई देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार संताेष महले, मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके, पाेलीस निरिक्षक डाॅ. विशाल जयस्वाल, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. अभिषेक कुमरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास उपविभागीय अधिकारी करीत आहेत.
इतरही रुग्णालयांमध्येही काेराेनाचे रुग्ण भरती
देसाईगंज शहरातील आणखी एका हाॅस्पिटलमध्ये काेराेनाचे रुग्ण भरती हाेते. मात्र, प्रशासनाने दाेन हाॅस्पिटलवर कारवाई केल्याचे माहीत हाेताच भरती असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले. परवानगी नसतानाही या ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन, फॅबीक्यू औषधीसाठा, रॅपिड ॲँटिजेन टेस्ट केल्या जातात. यावर सरकारचे नियंत्रण नसतानाही खासगी रुग्णालयांत कशा काय उपलब्ध हाेतात, असा प्रश्न उपस्थित हाेत आहेत. याची चाैकशी करणे गरजेचे आहे.