अकृषक व बांधकाम परवानगीचे अधिकार एसडीओंना
By Admin | Updated: February 5, 2017 01:30 IST2017-02-05T01:30:10+5:302017-02-05T01:30:10+5:30
नगर पालिका क्षेत्रात होणारी अतिक्रमणे रोखणे आणि मोठ्या प्रमाणावर होणारी अनधिकृत प्लॉटविक्री

अकृषक व बांधकाम परवानगीचे अधिकार एसडीओंना
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : प्लॉट खरेदी, विक्री प्रकरणातील अनियमितता रोखण्यासाठी उपाययोजना
गडचिरोली : नगर पालिका क्षेत्रात होणारी अतिक्रमणे रोखणे आणि मोठ्या प्रमाणावर होणारी अनधिकृत प्लॉटविक्री रोखणे व सुनियोजित शहरांचा विकास करण्यासाठी नगरपालिकांसह नव्याने तयार झालेल्या नगरपंचायत क्षेत्रात अकृषक परवानगी सह बाधकाम परवानगी यांचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी घेतला आहे. यातील काही अधिकारांचा वापर तहसील स्तरावर योग्य वापर होत नाही असे निदर्शनास आले होते.
या स्तरावर विकास नियंत्रण नियमावलीचा आधार घेऊनच अकृषी परवानगी घ्यायची होती. मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरालगत मोठ्या प्रमाणावर बेकायदा प्लॉट विक्री होत आहे. तसेच त्यातून नागरीकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
बांधकाम परवानगीचाही मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गैरवापरामुळे शहरालगत अनधिकृत वस्त्यांची वाढ होत आहे. या सर्वांचा नंतर शहरी यंत्रणांवर ताण येतो. पावसाळ्यात अनेक भागात पाण्यात घरे बुडाल्याच्या तक्रारी येतात. परंतु वास्तवात ही बांधकामे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत आहेत असेही जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. हे सर्व थांबविण्यासाठी या अधिकारात बदल व अधिकार वर्ग करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
१ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हाधिकारी नायक यांनी हा निर्णय एका पत्राव्दारे जाहीर करीत अधिकार वर्ग केले आहेत. यात म्हटले आहे की अकृषक तसेच बांधकाम परवानगी प्रकरणी यापूर्वी नायब तहसीलदार व तहसीलवर यांच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याने नियोजनबध्द विकासाला खिळ बसली आहे.
नियोजनबध्द व सुनियोजित विकास होण्यासाठी अकृषक व बांधकाम परवानगीचे अधिकार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १३ (१) नुसार वर्ग १ व २ गावांसाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी प्रदान करण्यात येत आहे. प्लॉट खरेदी, विक्री तसेच घर बांधकामाची प्रक्रिया आता गतिमान होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
नागरिकांनो, फसवणुकीपासून सावध राहा
मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्लॉटविक्रीच्या जाहिरातींना भूलून गूंतवणूक करण्यापूर्वी प्लॉट विक्री करणाऱ्यांकडील कागदपत्रांची खातरजमा करुनच गूंतवणूक करावी व होणाऱ्या फसवणूकीपासून सावध रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे या निमित्ताने करण्यात आले आहे.