स्काऊट, गाईडचे चाचणी शिबिर
By Admin | Updated: September 21, 2015 01:25 IST2015-09-21T01:25:43+5:302015-09-21T01:25:43+5:30
भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा संस्था गडचिरोलीच्या विद्यमाने राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिर नुकतेच पार पडले.

स्काऊट, गाईडचे चाचणी शिबिर
राष्ट्रपती पुरस्कार : प्रात्यक्षिकाद्वारे दिली माहिती; विविध विषयांवर मार्गदर्शन
गडचिरोली : भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा संस्था गडचिरोलीच्या विद्यमाने राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिर नुकतेच पार पडले.
दोन दिवसीय शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्काऊटचे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त वाय. आर. मेश्राम, गाईडच्या जिल्हा प्रशिक्षण आयुक्त सुधा सेता, एम. एन. निंबार्ते, प्रमोद दशमुखे, कांचन बोकडे, जिल्हा चिरटणीस अजय लोंढे, सहचिटणीस वैशाली खंगार, स्काऊटचे जिल्हा संघटन आयुक्त नितेश झाडे, गाईचे संघटन आयुक्त माधुरी जवणे उपस्थित होत्या.
जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या स्काऊट आणि गाईड यांना राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिरात भरघोस यश मिळावे म्हणून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. स्काऊट आणि गाईड यांना राष्ट्रपती पुरस्कार परीक्षेचे स्वरूप, ध्वजारोहण पद्धती, संदेशन, गणवेश, होकायंत्र दिशा, प्रावीण्य पदके, प्राथमिक उपचार, गाठींचे व बांधण्याचे प्रकार, गॅझेट, प्रात्यक्षिक आदी बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रशिक्षणार्थ्यांकडून लेखी परीक्षेचा सराव घेण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना वाय. आर. मेश्राम म्हणाले, राष्ट्रपती पुरस्कार पटकाविण्याचे ध्येय प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे. सदर ध्येय गाठण्यासाठी शिस्त, संयम, परिश्रम, या बाबींना जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. पुरस्कारासाठी स्काऊट, गाईड पात्र ठरावे या हेतूने सदर चाचणी शिबिर घेण्यात आला. यात अनेकांनी सहभाग घेतला.
यावेळी मान्यवरांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयातील सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)