विज्ञान परीक्षक शिक्षकाकडे मराठीच्या उत्तरपत्रिका
By Admin | Updated: March 8, 2015 00:48 IST2015-03-08T00:48:06+5:302015-03-08T00:48:06+5:30
कुरखेडा येथील कुथे पाटील विद्यालयाच्या एका विज्ञान विषयाच्या शिक्षकाकडे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे उत्तरपत्रिका तपासणीकरिता डाकेद्वारे मराठी विषयाचे पेपर आले.

विज्ञान परीक्षक शिक्षकाकडे मराठीच्या उत्तरपत्रिका
वैरागड : कुरखेडा येथील कुथे पाटील विद्यालयाच्या एका विज्ञान विषयाच्या शिक्षकाकडे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे उत्तरपत्रिका तपासणीकरिता डाकेद्वारे मराठी विषयाचे पेपर आले. याबाबतची माहिती संबंधित परीक्षकाने समीक्षकामार्फत नागपूर विभागीय मंडळाला दिली असून सदर मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीकरिता थांबविण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून येते.
माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने इयत्ता दहावीच्या मराठी विषयाचा पहिला पेपर ३ मार्च रोजी घेण्यात आला. या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी परीक्षकांकडे पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. कोणत्या समीक्षकाकडे (मॉडरेटर) कोणत्या विषयाचे परीक्षक परीक्षणासाठी असतील याबाबत नियोजन करण्यासाठी नागपूरच्या विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत नियोजन पूर्वक तपशीलवार माहिती देण्यात आली. कढोली येथील मराठी विषयाच्या समीक्षिका म्हणून एम. एम. भोयर यांची निवड करण्यात आली आहे. कुरखेडा येथील कुथे पाटील विद्यालयाच्या विज्ञान विषयाच्या एका शिक्षकाकडे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी देण्यात आल्या. या संबंधी मराठी विषयाच्या समीक्षकाकडे संबंधित शिक्षकांनी माहिती दिली. समीक्षकांनी सदर प्रकार शिक्षण मंडळाला सांगितला.