जिल्ह्यात आजपासून विद्यार्थ्यांविना शाळा हाेणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:57+5:302021-06-28T04:24:57+5:30
गडचिराेली : राज्य शासनाच्या निर्देशानुसार व जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या आदेशान्वये काेविडच्या पार्श्वभूमीवर २८ जून साेमवारपासून जिल्ह्यातील सर्व शाळा ...

जिल्ह्यात आजपासून विद्यार्थ्यांविना शाळा हाेणार सुरू
गडचिराेली : राज्य शासनाच्या निर्देशानुसार व जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या आदेशान्वये काेविडच्या पार्श्वभूमीवर २८ जून साेमवारपासून जिल्ह्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांविनाच सुरू हाेणार आहेत. गतवर्षीप्रमाणेच आताही ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाची प्रक्रिया चालविण्यात येणार आहे. काेविड संकटामुळे विद्यार्थी शाळेत जाणार नाही. मात्र, शाळेतील गुरुजींना दरराेज शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिवाय शिक्षकांनी मुख्यालयी राहून कर्तव्य पार पाडावे, असे आदेशही प्रशासनाने निर्गमित केले आहेत.
काेराेना संकटामुळे गतवर्षीचे सन २०२०-२१ हे संपूर्ण शैक्षणिक सत्र ऑनलाइन पद्धतीनेच पार पडले. शैक्षणिक सत्राच्या शेवटी ९ ते १२ व त्यानंतर ५ ते ८ वीचे वर्ग प्रत्यक्ष भरविण्यात आले हाेते. त्यानंतर काेराेनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष वर्ग बंद करण्यात आले आहेत. आता सन २०२१-२२ हे नवे शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू हाेत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी शनिवारी व रविवारी जाऊन शाळेत स्वच्छता माेहीम राबविली. काेविड नियमाचे पालन करून शैक्षणिक सत्र चालणार आहे.