स्कूल व्हॅन व्यावसायिकांना शाळा बंदचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST2021-07-22T04:23:11+5:302021-07-22T04:23:11+5:30
मागील १५ महिन्यांपासून कोरोना महामारीने ‘सळो की पळो’ करून सोडले, त्यामुळे देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी शासनाला करावी लागली. ...

स्कूल व्हॅन व्यावसायिकांना शाळा बंदचा फटका
मागील १५ महिन्यांपासून कोरोना महामारीने ‘सळो की पळो’ करून सोडले, त्यामुळे देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी शासनाला करावी लागली. त्यासाठी सर्वत्र शाळा, कॉन्व्हेंट बंद करण्यात आले. यामुळे स्कूल व्हॅन चालक-मालकावर मोठे संकट ओढवले. अनेकांनी बँक, खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून स्कूल व्हॅन खरेदी करून व्यवसाय सुरू केला. मात्र, काेराेनामुळे त्यांचा रोजगार हिरावला गेला. शहरात जवळपास ११ स्कूल व्हॅन चालक असून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तसेच वेळोवेळी करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे या व्यवसायावर संक्रांत आली आणि व्हॅन उभ्या ठेवण्याची पाळी आली. चालक व मालकापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले तर बँकेचे कर्ज कसे भरायचे, कुटुंबाचा खर्च कसा करायचा, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
यावर्षी तरी शाळा सुरू होतील, अशी आशा होती; मात्र शाळा सुरू झाल्या तेही विद्यार्थ्यांविना. त्यामुळे त्यांची आशा मावळली आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कॉन्व्हेंट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी ये-जा करत असतात; मात्र शाळा बंदचा त्यांनाही फटका बसला. शिक्षणासाठी काम करीत असलेल्या स्कूल व्हॅन चालक - मालकांचा शासनाने सुद्धा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे- त्यासाठी कॉन्व्हेंट, शाळा सुरू करावी म्हणजे व्हॅन चालकांचा व्यवसाय सुरू होईल़, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
(बॉक्स)
व्यवसायावर बंधने
स्कूल व्हॅन, बसमधून केवळ विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची परवानगी आरटीओ कार्यालयाकडून मिळते. या गाडीने अन्य प्रकारची प्रवासी वाहतूक व इतर वाहतूक करण्यास उपयोग करता येत नाही, त्यासाठी सर्वांना कारवाईची भीती असते. त्यामुळे आता शासनाच्या निर्णयाकडे या व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
शाळा सुरू करण्याची मागणी
गेल्या अनेक वर्षांपासून नोकऱ्या मिळणे कठीण झाले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्कूल व्हॅन व्यवसाय सुरू केला; मात्र कोरोनामुळे तोही रोजगार हिरावला. त्यामुळे व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. घेतलेले कर्ज कसे भरायचे, या विवंचनेत असल्याचे सांगून शासनाने विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
गुड्डू येनगट्टीवार, वाहन चालक-मालक व्यावसायिक चामोर्शी