राममोहनपूरची शाळा अद्यापही कुलूपबंदच
By Admin | Updated: December 27, 2014 22:50 IST2014-12-27T22:50:26+5:302014-12-27T22:50:26+5:30
अनेकदा जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करूनही राममोहनपूर जि. प. शाळेला शिक्षक देण्यात आले नाही. परीक्षेचा कालावधी येताच संतप्त पालकांनी शाळा

राममोहनपूरची शाळा अद्यापही कुलूपबंदच
गुंडापल्ली : अनेकदा जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करूनही राममोहनपूर जि. प. शाळेला शिक्षक देण्यात आले नाही. परीक्षेचा कालावधी येताच संतप्त पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने १७ डिसेंबरला शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळेला कुलूप ठोकले होते. मात्र पालकांची मागणी पूर्ण न झाल्याने राममोहनपूर शाळा अद्यापही कुलूपबंदच असल्याची माहिती आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
चामोर्शी पंचायत समितीअंतर्गत राममोहनपूर या गावात जिल्हा परिषदेची १ ते ८ वर्गापर्यंतची उच्च प्राथमिक शाळा आहे. या शाळेत एकूण १०६ विद्यार्थी आठही वर्गात शिक्षण घेत आहेत. मात्र अर्धेअधिक सत्र संपूनही राममोहनपूर शाळेला नवे शिक्षक देण्यात आले नाही. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज मुरारी सरकार व अन्य पदाधिकाऱ्यांनी अनेकदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे राममोहनपूर शाळेत तत्काळ नव्या शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. याशिवाय पालकांनीही अधिकाऱ्यांकडे शिक्षक नियुक्त करण्याची मागणी लावून धरली होती. मात्र एकाही अधिकाऱ्यांनी दखल घेऊन राममोहनपूर शाळेत नव्या शिक्षकाची नियुक्ती केली नाही. राममोहनपूर शाळेत वर्षभरापासून दोनच शिक्षक कार्यरत असून त्यांना १ ते ८ वर्ग सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नक्षलग्रस्त, दुर्गम भागातील राममोहनपूर शाळेकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)