परीक्षेच्या तोंडावर शालेय पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा
By Admin | Updated: February 26, 2016 01:44 IST2016-02-26T01:44:00+5:302016-02-26T01:44:00+5:30
शनिवार १३ फेब्रुवारीपूर्वी जिल्ह्याच्या आरमोरी व अहेरी तालुक्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहाराच्या धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता.

परीक्षेच्या तोंडावर शालेय पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा
सोमवारपासून प्रारंभ : शासनाकडून उशिरा मिळाली मुदतवाढ
गडचिरोली : शनिवार १३ फेब्रुवारीपूर्वी जिल्ह्याच्या आरमोरी व अहेरी तालुक्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहाराच्या धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी अनेक शाळांमध्ये सदर पोषण आहार शिजला नाही. शाळा मुख्याध्यापक व पालकांकडून ओरड सुरू झाल्यानंतर दि विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने १५ फेब्रुवारी सोमवारपासून जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात शालेय पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने एटापल्ली तालुक्याला १७४.४० मेट्रिक टन तांदळाची मागणी करण्यात आली. मुलचेरा तालुक्याला ४७३.४७ मेट्रिक टन, धानोरा तालुक्याला ३.६० मेट्रिक टन, देसाईगंज तालुक्यातील शाळांना २४८.७२ मेट्रिक टन, कोरची तालुक्यातील शाळांना ११०.८७ मेट्रिक टन, गडचिरोली तालुक्यातील शाळांना ३८.६६२ मेट्रिक टन व आरमोरी तालुक्यातील शाळांसाठी ६.७५ मेट्रिक टन तांदळाची मागणी करण्यात आली. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने को-आॅपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन लिमिटेडला शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ व इतर धान्याच्या मालासाठी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी मुदतवाढ देण्यात आली. सदर मुदतवाढ मिळण्यापूर्वीच अहेरी, आरमोरीसह काही तालुक्यातील शाळांमध्ये तांदूळ व धान्यादी मालाचा तुटवडा निर्माण झाला. तर काही शाळांमध्ये यापूर्वी पुरविण्यात आलेल्या शिल्लक मालाचा वापर शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी केला जात आहे.
इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांची शालेय परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. आता या वर्गातील विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ आला आहे. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे शाळांमधील पोषण आहार योजनेतील धान्य व धान्यादी मालाचा साठा संपल्यानंतरही या मालाचा पुरवठा करण्यात आला नाही. अध्या जिल्ह्यात धान्य व इतर मालासाठी ओरड सुरू झाल्यानंतर प्रशासनाने धान्य व इतर मालाचा पुरवठा सुरू केला आहे. (प्रतिनिधी)