बीजे अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडपली
By Admin | Updated: February 7, 2015 23:23 IST2015-02-07T23:23:34+5:302015-02-07T23:23:34+5:30
चंद्रपूर येथील एलआरटी भोसले कॉलेज आॅफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात सत्र २०१२-१३ मध्ये बीजे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

बीजे अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडपली
गडचिरोली : चंद्रपूर येथील एलआरटी भोसले कॉलेज आॅफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात सत्र २०१२-१३ मध्ये बीजे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यातच आली नाही, असा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सहायक समाज कल्याण आयुक्त पदाचा भार वाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी कुठलीही चौकशी केली नाही. असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.
२०१२-१३ या शैक्षणिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी असलेला मंगेश बंडुजी भांडेकर व अन्य एक अशा दोन विद्यार्थ्यांनी चंद्रपूर येथील एलआरटी भोसले कॉलेज आॅफ मॅनेजमेंट या संस्थेत बीजे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. दोन्ही विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांचे अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. या विद्यार्थ्याला प्रत्येकी ७ हजार रूपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. मात्र संस्थेकडून या दोघांनाही शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात आली नाही.
त्यानंतर भांडेकर याने संस्थेकडे चौकशी केली. त्यावेळी संस्थेतून समाज कल्याण विभागाकडे चौकशी करा, असे सांगण्यात आले. त्यानंतर चंद्रपूर येथील समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त टी. डी. बरगे यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार देण्यात आली. ते गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याचा पदभार सांभाळून होते. मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसतानाही तक्रारीची दखल अद्यापही घेतलेली नाही. हे दोनही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)