दुर्बल घटकांसाठीची शिष्यवृत्ती योजना फसवी
By Admin | Updated: August 21, 2016 02:33 IST2016-08-21T02:33:18+5:302016-08-21T02:33:18+5:30
इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने एनसीईआरटी मार्फत सुरू

दुर्बल घटकांसाठीची शिष्यवृत्ती योजना फसवी
गडचिरोेली : इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने एनसीईआरटी मार्फत सुरू केलेली शिष्यवृत्ती योजना पूर्णत: फसवी आहे. चार शैक्षणिक सत्रापैकी केवळ एकाच सत्रात या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला असल्याच्या तक्रारी संघटनेला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे केंद्र शासनाकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे, असा आरोप डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, सन २००७-०८ या शैक्षणिक सत्रापासून केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्लीच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सदर शिष्यवृत्ती योजना लागू केली. या शिष्यवृत्तीसाठी प्राप्त विद्यार्थी शोधण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयामार्फत सदर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत दरमहा ५०० रूपयेप्रमाणे वर्षाला ६ हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र सदर शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात परिपूर्ण होत नसल्याने अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित आहेत, असा आरोप प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे.