नदीच्या जिल्ह्यात टंचाईच्या झळा
By Admin | Updated: March 21, 2015 01:51 IST2015-03-21T01:51:15+5:302015-03-21T01:51:15+5:30
गडचिरोली जिल्ह्यात पाच ते सात मोठ्या व जवळजवळ १० लहान नद्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या जाणवत नाही.

नदीच्या जिल्ह्यात टंचाईच्या झळा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पाच ते सात मोठ्या व जवळजवळ १० लहान नद्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या जाणवत नाही. परंतु यंदा अनेक नद्यांचे पात्र फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच कोरडे पडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे नदीपात्रात केवळ रेतीचे ढिगारेच दिसू लागले आहे. नदी पात्रातील पाण्याची धारही आता आटली असून गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची सुविधा नसल्याने अनेक शेतकरी नदी पात्रात खड्डा तयार करून त्यातून शेतीसाठी आॅईल इंजिनद्वारे पाणी उपसा करीत असतात. यंदा अनेक शेतकऱ्यांना आॅईल इंजिनसाठी नदीपात्रातून पाणी घेणेही कठीण होत आहे. आरमोरी तालुक्यात खोब्रागडी, गाढवी आदीसह अनेक नद्यांतून नागरिक शेतीसाठी पाणी घेत असतात. जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेल्या वैनगंगा नदीवर २५ गावांच्या पाणी पुरवठा योजनाही अवलंबून आहे. या योजनांसाठी दररोज शेकडो लिटर पाणी घेतले जाते. पुढील महिन्यात देसाईगंज, गडचिरोली नगर पालिकेलाही नदी पात्रात पाण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागणार आहे. यंदा शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे बांधल्यामुळे लहान गावात जलस्रोताचे स्तर टिकून आहेत. परंतु आता वाढत्या उष्णतामानामुळे पाणी समस्या बिकट होईल.