टंचाई आराखड्यास मंजुरी
By Admin | Updated: April 8, 2015 01:12 IST2015-04-08T01:12:11+5:302015-04-08T01:12:11+5:30
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सादर केलेल्या १६ लाख ६३ हजार ५०० रूपयांच्या पाणी टंचाई उपाययोजना कृती आराखड्याला....

टंचाई आराखड्यास मंजुरी
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सादर केलेल्या १६ लाख ६३ हजार ५०० रूपयांच्या पाणी टंचाई उपाययोजना कृती आराखड्याला जिल्हाधिकारी यांनी मंजुरी प्रदान केली आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या १० गावे व तीन वाड्यांमध्ये १ लाख ४ हजार ४०० रूपयांतून प्रत्येकी एक विंधन विहीर उभारण्यात येणार आहे.
भूजल सर्वेक्षण व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सर्वेक्षण करून जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या असलेल्या गाव व वाड्याची माहिती संकलीत करण्यात आली. एप्रिल ते जून २०१५ या कालावधीत तिसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील १० गावे व तीन वाड्यांमध्ये पाणी टंचाई उपाययोजना करण्यासाठी जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या पाणी टंचाई उपाययोजना कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी प्रदान केली असून पाणी टंचाई असलेल्या दहा गावे व तीन वाड्यांमध्ये लवकरच विंधन विहिरीचे काम जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने प्रस्तावित विंधन विहिरी बांधकामाचे प्रस्ताव अंदाजपत्रकाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी प्रदान केली आहे. पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये प्रत्येकी एक लाख चार हजार ४०० रूपयांतून विंधन विहीर बांधण्यात येणार आहे.
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील एकाही गावात पाणी टंचाई दिसून आली नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यात दहा गावे व तीन वाड्यांमध्ये पाणी टंचाईची सावट राहणार आहे. या गावातील पुरेशा पाण्याची सोय करण्यासाठी जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाई उपाययोजना कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात अनेक गावात पाणी टंचाईची समस्या असली तरी आराखड्या त्या गावांचा नामोल्लेख नाही, हे विशेष. (स्थानिक प्रतिनिधी)