धान खरेदी केंद्रांवर बारदाण्याचा तुटवडा
By Admin | Updated: December 7, 2014 22:51 IST2014-12-07T22:51:54+5:302014-12-07T22:51:54+5:30
तालुक्यात काही ठिकाणी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र या केंद्रांवर बारदाण्याचा तुटवडा असल्याने धान खरेदी संस्थांसह शेतकऱ्यांसमोर फार

धान खरेदी केंद्रांवर बारदाण्याचा तुटवडा
कोरची : तालुक्यात काही ठिकाणी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र या केंद्रांवर बारदाण्याचा तुटवडा असल्याने धान खरेदी संस्थांसह शेतकऱ्यांसमोर फार मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शासनाने धान खरेदी केंद्रांसमोर यावर्षी जाचक अटी लादल्याने जिल्ह्यातील विविध कार्यकारी संस्थांनी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास बरेच दिवस टोलवाटोलवी केली. त्यानंतर मात्र धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास एक महिना उशीराने धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. धान खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी या केंद्रांवर आदिवासी विकास महामंडळाने बारदाना उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान कुठे ठेवावे, असा प्रश्न धान खरेदी केंद्रांच्या व्यवस्थापणासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे काही धान खरेदी केंद्रांनी धान खरेदी बंद केली आहे. बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान उघड्यावर ठेवण्यात येईल व यामध्ये काही नुकसान झाल्यास शेतकऱ्याचीच रक्कम कपात करण्यात येईल, असे धोरण धान खरेदी केंद्राच्या व्यवस्थापनाने सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरीसुध्दा धान विक्री करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. नाईलाजास्तव शेतकऱ्यांनी धान घरीच भरून ठेवले आहे. सुरू झालेल्या धान खरेदी केंद्रावर ही नवीनच अडचण निर्माण झाली आहे. धान खरेदी केंद्र व्यवस्थापणाने आदिवासी विकास महामंडळाकडे बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. प्रत्येक धान खरेदी केंद्राला दर दिवशी शेकडो बारदाना लागतो.
कोरची तालुक्यातील कोटगूल व कोटरा या ठिकाणी अजुनही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. सदर केंद्र तत्काळ सुरू करावे, त्याचबरोबर एकरी १० क्विंटल धान खरेदी करण्याची असलेली अट वाढवून १५ क्विंटल करण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्यामलाल मडावी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)