संकलित चाचणीच्या प्रश्नपत्रिकांचा तुटवडा
By Admin | Updated: April 7, 2017 01:18 IST2017-04-07T01:18:00+5:302017-04-07T01:18:00+5:30
शिक्षण विभागाच्या वतीने पहिली ते आठवीची संकलित चाचणी ६ व ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.

संकलित चाचणीच्या प्रश्नपत्रिकांचा तुटवडा
उशिरा पेपर सुरू : शाळांवर हजारो रूपयांचा भूर्दंड
गडचिरोली : शिक्षण विभागाच्या वतीने पहिली ते आठवीची संकलित चाचणी ६ व ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान देसाईगंज व गडचिरोली तालुक्यातील काही शाळांमध्ये प्रश्नपत्रिकांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे शाळांना झेरॉक्स काढून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्याव्या लागल्या.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे सामूहिक परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे पेपर विद्या परिषदेच्या मार्फतीने शाळांना उपलब्ध करून दिले जातात. मागील वर्षीपासून सदर परीक्षा घेतली जात आहे. शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीच्या कालावधीत संकलित चाचणी क्रमांक १ घेण्यात आली होती. त्यानंतर ६ व ७ एप्रिल रोजी संकलित चाचणी क्रमांक २ घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले होते. या चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नपत्रिका विद्या परिषद उपलब्ध करून देते. मात्र गडचिरोली तालुक्यातील काही शाळांना प्रश्नपत्रिकांचा तुटवडा निर्माण झाला होता. प्रश्नपत्रिकांचे वितरण गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने करण्यात आले. मात्र या ठिकाणी नियोजनाचा अभाव होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रश्नपत्रिकांची मागणी केली होती. प्रत्यक्षात मात्र कमी संख्येत प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या. यामध्ये प्रामुख्याने सेमी इंग्लिश माध्यमांच्या शाळांना समस्या जाणवली. गडचिरोली येथील जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेत सेमी इंग्लिश मीडियम आहे. या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा इंग्रजी आहे. त्यामुळे भाषा विषयाच्या संकलित चाचणीचे पेपर इंग्रजीमधून उपलब्ध होणे आवश्यक होते.
या शाळेत प्रत्येक वर्गात जवळपास ४० ते ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तेवढ्या प्रश्नपत्रिका असणे गरजेचे होते. मात्र केवळ ४ ते ५ प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या. परिणामी प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका द्याव्या लागल्या. काही ठिकाणी पहिल्या गट्ट्यात तिसरीच्या प्रश्नपत्रिका आढळून आल्या. शाळेवर सदर प्रश्नपत्रिका नेल्यानंतर ऐन वेळेवर शिक्षकांची फार मोठी धावपळ झाली. शिक्षण विभागाच्या या कारभाराबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी गणिताचा पेपर आयोजित करण्यात आला आहे. याही पेपरच्या अत्यंत कमी प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे याही प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढावी लागली. यामध्ये बराच वेळ गेला. (नगर प्रतिनिधी)