सावलखेडाच्या शंकरपटावर धाड
By Admin | Updated: August 17, 2015 01:08 IST2015-08-17T01:08:33+5:302015-08-17T01:08:33+5:30
येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारुबंदी पथकाने रविवारी आरमोरी तालुक्यातील सावलखेडा येथे सुरु असलेल्या शंकरपटावर धाड घालून सात जणांवर गुन्हे दाखल केले.

सावलखेडाच्या शंकरपटावर धाड
विशेष दारूबंदी पथकाची कारवाई : चार लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक
आरमोरी : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारुबंदी पथकाने रविवारी आरमोरी तालुक्यातील सावलखेडा येथे सुरु असलेल्या शंकरपटावर धाड घालून सात जणांवर गुन्हे दाखल केले. यातील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
आरमोरी तालुक्यातील सावलखेडा येथे बसथांब्याच्या बाजूला बैलांचा शंकरपट भरवून त्यावर पैज लावण्यात येत असल्याची माहिती मिळताच जिल्हा दारुबंदी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक कोळी यांच्या नेतृत्वातील पथकाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी धाड टाकली. यावेळी तेथे छकडयाला बैल जुंपून त्यांची शर्यत लावली जात असल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोलिसांनी काही इसमांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, ते पळून गेले. मात्र त्यांनी सुनील विश्वनाथ कुमरे रा. चातगाव, दीपक हरिदास ठाकरे रा. आरमोरी, दशरथ रामकृष्ण राऊत रा. सावलखेडा व सुखदेव बन्सोड रा. भेंडाळा ता. सिंदेवाही यांना ताब्यात घेतले. सुनील कुमरेच्या अंगझडतीत पोलिसांना १०२३० रुपये, सुखदेव बन्सोड याच्याकडे ३४००० रुपये, पटांगणावर आढळलेले २ लाख ७० हजार ३५० रुपये, दाणीच्या सिग्नलजवळ लावलेली ४५०० रुपयांची ३ घड्याळे व सुनील कुमरेच्या मालकीची १ लाख रुपये किमतीची टाटा इंडिगो असा एकूण ४ लाख १० हजार ८० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी डोंगरे रा.गोसे, नामदेव तानूजी फुकटे रा,लोहारा, गुलचंद नामदेव रा.इटगाव यांच्यावरही गुन्हे दाखल केले(वार्ताहर)