क्षतिग्रस्त पुलामुळे साबांविने बस वाहतूक नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 01:28 IST2017-02-06T01:28:35+5:302017-02-06T01:28:35+5:30
अहेरीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या व्यंकटापूर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी तीन दिवशीय यात्रा भरते.

क्षतिग्रस्त पुलामुळे साबांविने बस वाहतूक नाकारली
एसटीचे उत्पन्न बुडणार : व्यंकटापूर येथील महाशिवरात्रीच्या जत्रेपासून भाविक राहणार वंचित
विवेक बेझलवार अहेरी
अहेरीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या व्यंकटापूर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी तीन दिवशीय यात्रा भरते. मात्र देवलमारीचा पूल क्षतिग्रस्त झाला असल्याने देवलमारी पुलावरून प्रवासी वाहतूक वाहनचालकाच्या काळजीपूर्वक चालविण्याच्या अटीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्य केले आहे. या संदर्भातील पत्र साबांविने राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराला दिले असल्याने अहेरी आगाराने महाशिवरात्रीच्या यात्रेला सदर पुलावरून बसफेऱ्या सोडण्यास असमर्थता दर्शविली आहे. परिणामी बस सुविधेअभावी व्यंकटापूर येथील जत्रेपासून परिसरातील हजारो भाविक वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाशिवरात्रीच्या जत्रेनिमित्त व्यंकटापूर येथे तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड या तिन्ही राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी येतात. गेल्या दहा वर्षांपासून अहेरी आगारातर्फे देवलमरी पुलावरून बसफेऱ्या सोडल्या जातात. मात्र आता देवलमरीचा पूल गेल्या अनेक दिवसांपासून क्षतिग्रस्त झाला आहे. सद्य:स्थितीला अनुसरूण सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पूल प्रवाशी वाहतुकीसाठी योग्य असल्याचे पत्र न देता सदर पूल क्षतिग्रस्त झाल्याने वाहन चालकाच्या स्वत:च्या काळजीपूर्वक अटीवर वाहन चालविण्यास समर्थता दाखविली आहे. अशा अटीपूर्ण पत्रामुळे राज्य परिवहन महांडळाच्या अहेरी आगाराने महाशिवरात्री यात्रेदरम्यान व्यंकटापूरकडे सदर पुलावरून बसफेऱ्या सोडण्यास असमर्थता दर्शविली आहे. महाशिवरात्री जत्रेनिमित्त कोणता तरी वळण मार्ग काढून व्यंकटापूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी बसफेऱ्या सोडण्यात याव्या, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
व्यंकटापूर येथे यात्रास्थळी मागील वर्षी अहेरी आगरातर्फे सहा बसेस भाविकांच्या सुविधेसाठी सोडण्यात आल्या होत्या. ५० बसफेऱ्यांच्या माध्यमातून यात्रा काळात अहेरी आगाराला ४४ हजार ६३७ रूपयांचे उत्पन्न तीन दिवसात प्राप्त झाले होते. मात्र यंदा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाहतुकीस योग्य असे प्रमाणपत्र देण्यात न आल्याने यंदा सदर यात्रास्थळी आम्ही बससेवा देऊ शकत नाही.
- सी. डी. घाघरगुंडे, आगार व्यवस्थापक अहेरी
विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांच्या पत्रातील उल्लेख
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अहेरी यांनी अहेरी-व्यंकटापूर-देवलमरी मार्गावर असलेल्या क्षतिग्रस्त पुलावरून बस काळजीपूर्वक चालविण्याच्या अटीवर नाहरकत प्रमाणपत्र दिलेले होते. मात्र साबांविकडून ‘वाहतुकीस योग्य’ असा स्पष्ट अभिप्राय प्राप्त झाल्याशिवाय सदर मार्गावर वाहतूक सुरू करण्यात येऊ नये, सदर पुलाच्या दुरूस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत राहावा, जेणेकरून बसफेरी सुरू करता येईल, असा उल्लेख विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी अहेरीच्या आगार व्यवस्थापकांना पाठविलेल्या पत्रात नमूद आहे.
अहेरी-व्यंकटापूर रस्त्यावर देवलमरीच्या पुढे क्षतिग्रस्त पूल असल्याने बस काळजीपूर्वक चालविण्याच्या अटीवर एसटी आगाराने आठमाही बससेवा सुरू करण्यास या कार्यालयाची हरकत नाही, असे साबांविने अहेरी आगाराला पाठविलेल्या नाहरकत प्रमाणपत्रात उल्लेख आहे.