साबांविचे रस्ते अपघातग्रस्त
By Admin | Updated: November 20, 2015 01:59 IST2015-11-20T01:59:25+5:302015-11-20T01:59:25+5:30
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त येणारे रस्ते खड्ड्यांमुळे दुरवस्थेत आहे.

साबांविचे रस्ते अपघातग्रस्त
देसाईगंज तालुका : कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- शंभरकर
देसाईगंज : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त येणारे रस्ते खड्ड्यांमुळे दुरवस्थेत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना झाडाझुडुपांचा वेढा घातल्याने रस्ते अरूंद होत आहेत. एकूणच सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते अपघातग्रस्त झाले आहेत. पं. स. च्या सभापती प्रीती शंभरकर यांनी संबंधित विभागाला पत्र पाठविले. परंतु दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सभापती प्रीती शंभरकर यांनी केली आहे.
शंकरपूर, डोंगरगाव, जोगीसाखरा मार्ग खड्डेमय झाला असून आरमोरी- देसाईगंज या मुख्य मार्गावर अनेक खड्डे पडल्याने काही महिन्यांपासून या मार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदर मार्गाची डागडुजी करण्यात आली होती. परंतु अल्पावधीतच अवस्था जैसे थे झाली आहे. या मार्गावरून वाहतूक करताना चारचाकी व दुचाकी वाहनांचे टायर फुटून अपघात झाल्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. अपघातात अनेकांना आपला जीव जागीच गमवावा लागला, असेही अपघात येथे घडलेले आहेत. अनेकजण गंभीर जखमी होऊन कायमचे अपंग झालेले आहेत, असे प्रीती शंभरकर यांनी म्हटले आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडाझुडुपांनी वेढा दिल्याने विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नाही. परिणामी केव्हाही अपघात होऊ शकतो. साबांविचे उपविभागीय अधिकारी यांची शहर समस्येकडे लक्ष देण्याची जबाबदारी आहे. तेच दुर्लक्ष करीत असतील तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तालुक्यातील रस्ते दुरूस्त करावे, अशी मागणी शंभरकर यांनी केली आहे.