सव्वा लाख निराधारांचे जगणे झाले सुसह्य
By Admin | Updated: April 17, 2016 01:16 IST2016-04-17T01:16:09+5:302016-04-17T01:16:09+5:30
निराधार, विधवा, परित्यक्ता अपंग तसेच वृध्द नागरिकांना थोडीफार आर्थिक मदत करून त्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी ...

सव्वा लाख निराधारांचे जगणे झाले सुसह्य
मासिक अनुदान : वृध्दापकाळात आर्थिक मदत
गडचिरोली : निराधार, विधवा, परित्यक्ता अपंग तसेच वृध्द नागरिकांना थोडीफार आर्थिक मदत करून त्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मासिक ६०० रूपये अनुदान दिले जात असून याचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ७७ नागरिकांना मिळत आहे.
वृध्दापकाळात शरीर थकले राहते. त्यामुळे कोणतेही काम करू शकत नाही. मात्र या कालावधीत औषधोपचारावर होणाऱ्या खर्चात वाढ झालेली असते. घरातील कर्ताव्यक्ती मृत्यूमुखी पडल्यानंतर संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. मुले लहान असल्यास आणखी अडचण वाढते. अपंगालाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व घटकांना थोडाफार आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी पात्र ठरलेल्या नागरिकांना शासनाकडून दरमहा ६०० रूपये अनुदान दिले जाते.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ११ हजार ७७ नागरिकांना या योजनांचा लाभ दिला जात आहे. जिल्हाभरात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १८ हजार २४८ लाभार्थी आहेत. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचे ५६ हजार २९७, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे ३३ हजार ८०३, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे २ हजार ३७८ व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचे ३५१ लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना सद्य:स्थितीत ६०० रूपये अनुदान दिले जात आहे.
पाच ते सहा वर्षांपूर्वी हे अनुदान रोख स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप केले जात होते. त्यामुळे अनुदानाची उचल करतेवेळी पैशाची मागणी कर्मचारी वर्गाकडून केली जात होती. मात्र आता सर्वच लाभार्थ्यांचे अनुदान सरळ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. त्यामुळे या योजनेतील भ्रष्टाचारावर बराच मोठा आळा बसला असून लाभार्थ्यांच्या हातात अनुदानाची संपूर्ण रक्कम मिळत आहे. (नगर प्रतिनिधी)