सव्वालाख पुस्तके जिल्ह्यात दाखल
By Admin | Updated: May 16, 2015 01:59 IST2015-05-16T01:59:47+5:302015-05-16T01:59:47+5:30
यंदा उन्हाळ्याच्या सुट्या कमी करण्यात आल्या असून २६ जूनला शाळेचा ठोका पडताच विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.

सव्वालाख पुस्तके जिल्ह्यात दाखल
गडचिरोली : यंदा उन्हाळ्याच्या सुट्या कमी करण्यात आल्या असून २६ जूनला शाळेचा ठोका पडताच विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात सव्वालाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरित करण्यात येणार असून जिल्ह्यातील गटसाधन केंद्रात पाठ्यपुस्तक पोहोचविण्याचे काम आता सुरू झाले आहे.
आरमोरी येथील गटसाधन केंद्रात पहिल्या टप्प्याची पुस्तक पोहोचली आहे. यात ६१ हजार पुस्तके असून १२९ शाळांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी येथे वाटप होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरविली जात असतात. बालभारतीकडून हे पुस्तक जिल्ह्यांना पुरविले जाते. गडचिरोली जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत एक लाख २५ हजार ८६६ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यात पहिलीचे १५ हजार ९८४, दुसरीचे १६०३२, तिसरीचे १५ हजार ४१७, चवथीचे १५ हजार ७९४, इयत्ता पाचवीचे १५ हजार ९०१, इयत्ता सहावीचे १५ हजार ७४७, इयत्ता सातवीचे १६ हजार २९, इयत्ता आठवीचे १४ हजार ९६२ असे एकूण एक लाख २५ हजार ८६६ विद्यार्थी लाभार्थी पाठ्यपुस्तकासाठी आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या गटसाधन केंद्रामध्ये हे पुस्तक पाठविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून शाळेच्या पहिल्याच दिवशी यंदा विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक पडतील, अशी दाट शक्यता आहे.
तसेच गडचिरोलीसह अन्य ठिकाणच्या खासगी इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट शाळांमध्येही २१ जूनपासून विद्यार्थ्यांना पुस्तक शाळेतून विकत दिले जाणार आहे. याबाबत प्रवेश घेतानांच पालकांना सूचना लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी सुट्या कमी होऊनही शाळा, विद्यार्थी व शिक्षक विविध कामांमध्ये गुंतून राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)